धक्कादायक खुलासा! 'त्या' बिल्डरच्या हत्येत पत्नीचाच हात, प्रियकरालाही झाली अटक

घटनेतील मृत मनोजकुमार सिंग हा उलवे भागात राहण्यास होता. तसेच सीवूड सेक्टर-४४ भागात त्याचे अमन डेव्हलपर्स नावाचे कार्यालय होते.
(मृत मनोजकुमार सिंग)
(मृत मनोजकुमार सिंग)

नवी मुंबई : सीवूडमध्ये गत शनिवारी घडलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येत मृत मनोजकुमार सिंग याच्या पत्नीचा देखील सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे एनआरआय पोलिसांनी या हत्या प्रकरणात राजू उर्फ शमसुल अबुहुरैरा खान (२२) याच्या पाठोपाठ मनोजकुमारची पत्नी पूनम सिंग (३४) हिला देखील अटक केली आहे. राजू आणि पूनम या दोघांमध्ये प्रेमसंबध निर्माण झाल्याने तसेच मनोजकुमारची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या घटनेतील मृत मनोजकुमार सिंग हा उलवे भागात राहण्यास होता. तसेच सीवूड सेक्टर-४४ भागात त्याचे अमन डेव्हलपर्स नावाचे कार्यालय होते. शुक्रवारी मध्यरात्री मनोजकुमार सिंग हा त्याच्या कार्यालयात एकटाच असताना, अज्ञात मारेकऱ्याने त्याच्यावर जड वस्तूने हल्ला करून त्याची हत्या केली होती. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. मृत मनोजकुमार सिंग याने आपल्या सीवूड्स येथील कार्यालयात सुरक्षेच्या सर्वप्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे बाहेरचा कुणी व्यक्ती सहज आतमध्ये घुसून त्याची हत्या करणे अशक्य होते.

मालमत्ता हडप करण्यासाठी रचला हत्येचा कट

मनोजकुमार सिंग हा २०२२ मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेला होता. यादरम्यान मनोजकुमारची पत्नी पूनम सिंग हिच्यासोबत राजूचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मनोजकुमार हा त्याच्यावर दाखल असलेल्या ६ फसवणुकीच्या गुन्ह्यात कोर्टकचेरीमध्ये व्यस्त राहत होता. त्यामुळे भविष्यात कोर्टाकडून त्याची सर्व मालमत्ता जप्त होण्याची भीती पूनमला होती. त्यामुळे मनोजकुमारला ठार मारून त्याची मालमत्ता हडप करण्याचा कट या दोघांनी रचला होता. त्यानुसार गत शुक्रवारी मनोजकुमार हा रात्री उशिरापर्यंत आपल्या कार्यालयात एकटाच असल्याची संधी साधून राजूने त्याच्या डोक्यावर व तोंडावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची हत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in