चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला पती अटकेत

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला पती अटकेत

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीला नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे...

नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीला नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. उस्मान छत्तर सदरा (६०) असे या आरोपीचे नाव असून, गत शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना नेरूळमधील दारावे गावात घडली होती. त्यानंतर आरोपी हा आपल्या मूळ गावी पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी त्याला जुईनगर येथून अटक केली.

या घटनेतील मृत महिलेचे नाव लालबानू सरदार (४५) असे असून, ती नेरूळ येथील दारावे गावात पती व मुलासह राहत होती. गत शनिवारी सायंकाळी लालबानू हिचा मुलगा बाहेर गेला असताना, लालबानू ही घरामध्ये एकटीच होती. यादरम्यान तिचा पती उस्मान सरदार हा घरामध्ये गेला होता. यावेळी लालबानू व उस्मान सरदार या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याचवेळी उस्मान सरदार याने आपल्या पत्नीच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला करून तिची हत्या केली होती. त्यानंतर त्याने पलायन केले होते.

दरम्यान, रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास लालबानू हिचा मुलगा घरी आल्यानंतर घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी रक्ताने भरलेली फरशीचे तुकडे, चाकू आढळून आल्याने लालबानू हिच्या डोक्यात फरशीसारख्या जड वस्तूने घाव घालून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत उस्मान सरदार हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत असल्याची माहिती मिळाली. तसेच घरामध्ये उस्मान सरदार याचा रक्ताने माखलेला शर्ट सापडल्याने त्यानेच लालबानू हिची हत्या करून पलायन केल्याचा संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी उस्मान सरदारविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता.

logo
marathi.freepressjournal.in