'नमुंमपा'च्या उद्यान विभागात १०० कोटींचा घोटाळा; मनसेचा गंभीर आरोप; खरेदी-दुरुस्ती टेंडरमध्ये मोठा घोळ
नवी मुंबई : मागील पाच वर्षांत नवी मुंबई महानगरपालिकेच्या (नमुंमपा) उद्यान विभागाने खेळणी, ओपन जिम साहित्य खरेदी तसेच दुरुस्तीच्या सर्वसमावेशक निविदांमध्ये तब्बल १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे.
मनसेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शहर अध्यक्ष व प्रवक्ते गजानन काळे यांनी ही माहिती देत, उद्यान विभागातील कथित भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली. गजानन काळे म्हणाले की, २०२४ मध्ये गार्डन विभागाच्या ५ कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये ओपन जिम साहित्य ३०० टक्के चढ्या दराने खरेदी करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या कंत्राटदाराकडून साहित्य खरेदी करण्यात आले, त्याच कंत्राटदाराकडून बाजारभावाचे दरपत्रक मागवले असता खरेदी दर व प्रत्यक्ष बाजारभावात मोठा फरक असल्याचे मनसेच्या निदर्शनास आले.
तसेच, २०२४ मधील ५ कोटी रुपयांच्या दुरुस्ती टेंडरमध्ये रंगकाम, बेअरिंग दुरुस्ती यासाठीही बाजारभावापेक्षा हजारो रुपयांचे चढे दर लावण्यात आले, असा आरोप करण्यात आला. यासोबतच मोरबे धरण परिसरात व नवी मुंबईत ५ कोटी झाडे लावण्याचा टेंडर काढण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात झाडे लावण्यात आली नसल्याची माहिती असल्याचेही मनसेने सांगितले.
मनसेच्या आरोपानुसार, सर्वसमावेशक टेंडरमध्येही १८ कोटी रुपये अधिक खर्च करून कंत्राटदारांचे उखळ पांढरे करण्यात आले.
एका वर्षात हा घोटाळा सुमारे ३० कोटींचा, तर पाच वर्षांचा एकत्रित हिशेब केला असता तो १०० ते १५० कोटी रुपयांपर्यंत जातो, असा दावा करण्यात आला आहे.
दुरुस्ती खर्चाबाबतही मनसेने गंभीर आक्षेप घेतला आहे. २४,६५० रुपये किमतीच्या एअर वॉकरच्या बेअरिंग दुरुस्तीसाठी १२,८४८ रुपये, तर २४,८०० रुपये किमतीच्या हिप ट्विस्टरसाठी १३,९३१ रुपये दुरुस्ती खर्च दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच तीन व्यक्ती बसतील अशा बेंचच्या दुरुस्तीसाठी १२,००२ रुपये व रंगकामासाठी १३,४९३ रुपये खर्च दाखवण्यात आला, असेही सांगण्यात आले.
उद्यान विभागातील अनेक कामांमध्ये तेच तेच कंत्राटदार असल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी व लेखापरीक्षण करून अहवाल नागरिकांसाठी सार्वजनिक करावा, तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी मनसेने केली आहे.
नवी मुंबई ‘फ्लेमिंगोचे शहर’ म्हणून ओळखले जाते. मात्र, एकीकडे फ्लेमिंगोच्या अधिवासाची जागा बिल्डरांच्या संगनमताने विकण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करताना, दुसरीकडे शहरभर उभारण्यात आलेल्या फ्लेमिंगो शिल्पासाठी प्रत्येकी ९०,२०२ रुपये, वाघाच्या शिल्पासाठी १०,११४ रुपये, तर सिंहाच्या शिल्पासाठी १,२६,४९४ रुपये खर्च दाखवण्यात आल्याची माहिती मनसेने दिली. एवढ्या खर्चात तर जिवंत प्राणी घेऊन भव्य प्राणिसंग्रहालय उभारता आले असते.
गजानन काळे, अध्यक्ष शहर मनसे
६५,२४३ रुपये अधिक खर्च
महापालिकेने एअर वॉकर ८९,८९३ रुपयांना खरेदी केला, तर त्याच कंत्राटदाराकडून त्याचा बाजारभाव २४,६५० रुपये असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच एका साहित्यासाठी ६५,२४३ रुपये जादा देण्यात आले. हिप ट्विस्टर ५९,४६५ रुपये (बाजारभाव २४,८०० रुपये), फोर आर्म व्हील ५४,०३५ रुपये (बाजारभाव २१,४०० रुपये), शोल्डर एक्सरसाइज मशीन १,३७,९१८ रुपये (बाजारभाव ३८,००० रुपये), एबीएस बोर्ड ७३,१७७ रुपये, एअरो रायडर ८२,६८३ रुपये (बाजारभाव २०,५०० रुपये) अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

