नवी मुंबई : मनपात १४ गावे घुसवू नका! शिवसेना-भाजपमधील राजकीय कलह चिघळला

ठाण्याच्या नेत्यांना नवी मुंबईचे वाटोळे करू देणार नाही. हे शहर आमच्या नेत्यांनी जपले असून, त्याला उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे माजी नगरसेवक सुरज पाटील, नेत्रा शिर्के आणि अपर्णा गवते यांनी दिला.
नवी मुंबई : मनपात १४ गावे घुसवू नका! शिवसेना-भाजपमधील राजकीय कलह चिघळला
Published on

नवी मुंबई : ठाण्याच्या नेत्यांना नवी मुंबईचे वाटोळे करू देणार नाही. हे शहर आमच्या नेत्यांनी जपले असून, त्याला उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे माजी नगरसेवक सुरज पाटील, नेत्रा शिर्के आणि अपर्णा गवते यांनी दिला. शनिवारी ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेंद्र म्हस्के आणि बेलापूर विधानसभा शिवसेनेचे अध्यक्ष किशोर पाटकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपकडून ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

मनपा निवडणूक जवळ येताच आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईत सत्ताधारी शिवसेना आणि सहयोगी भाजपमध्येच संघर्ष उफाळल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे तालुक्यातील अडवली-भूताली, दहिसर, पिंपरी, वालीवली, भंडार्ली, गोटेघर, मोकाशी, उत्तरशिव, नागाव, नावळी, निघु, नारीवली, बामाळी, वाकळण व बाळे ही १४ गावे पूर्वी नवी मुंबई मनपा क्षेत्रात होती.

स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे आंदोलनांनंतर ही गावे मनपातून वेगळी करण्यात आली. मात्र काही वर्षांपूर्वी पुन्हा हट्टाने त्यांचा समावेश करण्यात आला.

शिवसेनेवर गंभीर आरोप

कोविड काळात आमचा निधी पळवला. पाणीही पळवले. आम्ही पाणी वापरत नसताना बारवी धरणग्रस्तांना मनपात नोकऱ्या दिल्या; मात्र दहा-बारा वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या भूमिपुत्रांना न्याय दिला नाही. एमआयडीसीमध्ये नवी मुंबईच्या तोडीचे शहर नाही, मात्र शहराविषयी आस्था नसलेले लोक त्याचे नुकसान करीत आहेत, अशी टीका सुरज पाटील यांनी केली आहे.

तुम्हाला नवी मुंबईविषयी काहीही आत्मियता नाही. सिडकोने वसवलेले हे शहर आम्ही जपले, मोठे केले. पुनर्विकासाला विरोध नाही; पण तो नियोजनबद्ध व्हावा, ही आमची ठाम भूमिका आहे. जनता दरबार हे जनतेच्या प्रश्नांचे व्यासपीठ असूनही तुम्ही त्याच्या विरोधात न्यायालयात जाता. हा विकास रोखण्याचा प्रयत्न आहे. - नेत्रा शिर्के, माजी नगरसेविका

मलनिस्सारण केंद्राची जमीन हडपण्यात आली. यादव नगरला शाळेसाठी चार भूखंड देण्यात आले; मात्र त्यातील दोन शाळेच्या पटांगणावर लॉजिंग उभारण्यात आले. हे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात घडले. आजही उद्योग मंत्री त्याच पक्षाचे आहेत. एमआयडीसी फुलवण्याऐवजी उद्ध्वस्त करण्याचे पाप सुरू आहे. हे आम्ही होऊ देणार नाही. - अपर्णा गवते, माजी नगरसेविका

logo
marathi.freepressjournal.in