नवी मुंबई : ऑनलाइन मालमत्ता करभरणा प्रणालीत १५ टक्के वाढ; लवकरच ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’चाही कर भरण्यासाठी समावेश

नवी मुंबईकर नागरिकांना ऑनलाइन मालमत्ताकर भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याकडे प्राधान्याने लक्ष देत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आधुनिक स्वरूपात नवी मालमत्ताकर ऑनलाइन संकलन प्रणाली सुरू केली आहे.
नवी मुंबई : ऑनलाइन मालमत्ता करभरणा प्रणालीत १५ टक्के वाढ; लवकरच ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’चाही कर भरण्यासाठी समावेश
Published on

नवी मुंबई : नवी मुंबईकर नागरिकांना ऑनलाइन मालमत्ताकर भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याकडे प्राधान्याने लक्ष देत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आधुनिक स्वरूपात नवी मालमत्ताकर ऑनलाइन संकलन प्रणाली सुरू केली आहे.

या नव्या प्रणालीद्वारे जलद व अत्यंत सहजपणे मालमत्ता कर भरणे शक्य होत असल्याने ही ऑनलाइन प्रणाली उत्तम असल्याचे अभिप्राय विविध स्तरांतील नागरिकांकडून स्वयंत्स्फूर्तीने प्राप्त होत आहेत. याशिवाय या नव्या प्रणालीमुळे ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांच्या संख्येतही साधारणत: १५ टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

नेट बँकिंग, यूपीआय, क्यूआर कोड, वॉलेट्स यांसारख्या जलद व सुलभ कार्यप्रणाली असणारे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेले विविध पेमेंट पर्याय नागरिकांना उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून प्रत्यक्ष महापालिका कार्यालयात जाऊन करभरणा करण्याच्या पारंपरिक ऑफलाइन पद्धतीपेक्षा, कुठेही न जाता घरून अथवा कार्यालयातून ऑनलाइन पेमेंट करण्याच्या पद्धतीला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे.

नागरिकांना कमी श्रमात व त्यांच्या वेळ आणि मूल्यात बचत होऊन करभरणा करण्याची प्रभावी सुविधा उपलब्ध असावी, याकडे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विशेष लक्ष देत जुन्या ऑनलाइन करभरणा प्रणालीतील त्रुटी अभ्यासपूर्वक दूर करून अधिक सुलभ व सहज अशी नवीन ऑनलाइन करभरणा प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये आता लवकरच ‘भारत बिल पेमेंट सिस्टिम’ प्रणालीची लक्षणीय भर पडत असून याद्वारे करभरणा अधिक जलद व सुलभ होणार आहे.

आयुक्तांचे आवाहन

महानगरपालिकेने थकबाकीदार नागरिकांसाठी मालमत्ताकर विलंब शास्तीमध्ये ५० टक्के सूट देणारी अभय योजना जाहीर केली असून नागरिकांनी ३१ मार्च रोजी, रात्री १२ वाजेपर्यंत विलंब शुल्क वजा करून अपली देयके भरावीत, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

१५ ते २० टक्के वाढ होईल

यामध्ये अधिक भर घालत येत्या १० ते १२ दिवसात ‘भारत बिल पेमेंट सिस्टिम' कार्यान्वित होत असून या सुविधेमुळे सर्व प्रमुख बँका, पेमेंट ॲप्स व इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरून थेट मालमत्ता कर भरणे, शक्य होणार आहे. यामुळे कोणत्याही बँकेतून किंवा ॲपमधून सहज पेमेंट करता येणार आहे व विशेष म्हणजे कोणत्याही वेळी, कुठूनही २४x७ पेमेंटची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे एनपीसीआयच्या मान्यतेने या प्रणालीव्दारे अधिक सुरक्षित व जलद व्यवहार होणार आहे. त्यामुळे ‘भारत बिल पेमेंट सिस्टिम' सुरू झाल्यानंतर ऑनलाइन करभरणा करणाऱ्यांच्या संख्येत अजून १५ ते २० टक्के वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in