Navi Mumbai : रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; सीवूड्स रेल्वे स्थानकातील घटना

रेल्वे रूळ ओलांडून जात असताना ती फलाट क्रमांक एकवरून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलखाली आली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी मुंबई : लोकलमधून उतरून रेल्वे रूळ ओलांडून जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या १६ वर्षीय तरुणी लोकल खाली आल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी सीवूड्स रेल्वे स्थानकात घडली. या अपघातात लोकल खाली अडकून पडलेल्या तरुणीला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली होती.

या अपघातातील मृत तरुणीचे नाव सना अब्दुल सिद्दीकी असे असून ती गोवंडी येथे राहण्यास होती. सोमवारी सकाळी सना नेहमीप्रमाणे सीवूड्स येथे क्लासला जाण्यासाठी गोवंडी येथून लोकलने निघाली होती. दुपारी ती सीवूड्स रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर सना रेल्वे रूळ ओलांडून जात असताना ती फलाट क्रमांक एकवरून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलखाली आली.

या लोकलखाली ती अडकून गंभीर जखमी झाल्याने तिला लोकल खालून बाहेर काढण्यासाठी लोकल सीवूड्स रेल्वे स्थानकात थांबून ठेवण्यात आली. नंतर लोकल पाठीमागे घेऊन त्याच्याखाली अडकून पडलेल्या जखमी सनाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in