

नवी मुंबई : ऐरोली येथील शिवसेना (शिंदे गट) स्वीकृत नगरसेवक साहिल देविदास चौगुले यांच्यावर दाखल असलेला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागून त्यातील ३० लाख रुपये स्वीकारताना रबाळे पोलिसांनी मुख्य आरोपी कुलदीपकुमार देवमाने याला रंगेहात अटक केली आहे.
घणसोलीतील विवाहितेने स्वीकृत नगरसेवक साहिल देविदास चौगुले यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. कुलदीपकुमार याने एका मध्यस्थामार्फत साहिल चौगुले यांना संपर्क साधला होता. तसेच कोर्टातून बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी १ कोटींची मागणी केली होती. कुलदीपकुमारने नगरसेवक चौगुले यांच्याकडून ५० हजार रुपये आगाऊ रक्कम स्वीकारली होती. त्यानंतर उर्वरित ३० लाखांची रोकड घेऊन आरोपीने चौगुले यांना २९ जून रात्री ऐरोली सैनिक रेसिडेन्सीच्या लॉबीत बोलावले होते. नगरसेवक चौगुले यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस पथकाने कुलदीपकुमार देवमाने याने चौगुले यांच्याकडून ३० लाख रुपये असलेली बॅग घेताना पकडले.