नवी मुंबई : ४ फ्लेमिंगोंचा मृत्यू, २ जखमी, जागतिक पाणथळ क्षेत्र दिनाला गालबोट; सिडकोची महाकाय कमान कारणीभूत

जागतिक पाणथळ क्षेत्र दिनाच्या आदल्या दिवशी चार फ्लेमिंगो मृत्यूमुखी पडण्याची तसेच दोन जखमी होण्याची घटना
नवी मुंबई : ४ फ्लेमिंगोंचा मृत्यू, २ जखमी, जागतिक पाणथळ क्षेत्र दिनाला गालबोट; सिडकोची महाकाय कमान कारणीभूत

नवी मुंबई : जागतिक पाणथळ क्षेत्र दिनाच्या आदल्या दिवशी नेरूळ जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या महाकाय साइनबोर्ड कमानीसोबत टक्कर झाल्यामुळे चार फ्लेमिंगो मृत्यूमुखी पडण्याची तसेच दोन जखमी होण्याची धक्कादायक घटना घडली.

मॉर्निंगवॉक, जॉगिंग करणाऱ्या लोकांनी गुरुवारी पहाटे साईन बोर्डासोबत पक्ष्यांची टक्कर होण्याचा आवाज ऐकला आणि काहींनी आपल्या डोळ्यांनी त्यांना खाली आदळताना देखील पाहिले.

मी चार मृत फ्लेमिंगो, तर दोन जबर जखमी झालेले फ्लोमिंगो पाहिले, असे दररोज जॉगिंगला जाणाऱ्या नेरूळचे मनीष पिटकर नावाचे पर्यावरणवादी यांनी सांगितले. त्यांना दुजोरा देत नेहमी चालायला येणाऱ्या प्रीतिका भारद्वाज देखील हेच म्हणाल्या, त्यांनी अग्निशामक दल आणि इतर हेल्पलाईन्सना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सर्पमित्र संपत माने घटनास्थळी आल्यावर त्यांनी रस्ता चुकलेल्या जखमी फ्लेमिंगोंना शांत करण्याचा प्रयत्न केला, ते दोन पक्षी नंतर उडून गेले.

‘मी १९२६ दूरध्वनी क्रमांकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो सेवेसाठी उपलब्ध नव्हता,’ असे प्रीतिका म्हणाल्या. मार्गस्थांनी नंतर या चार लहानग्या पक्षांना खाडीच्या पाण्यात प्रवाहित करून अश्रूपूर्ण निरोप दिला.

पर्यावरणवाद्यांनी या महाकाय साईन बोर्डाला तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली आहे. जल परिवहन प्रकल्प अपयशी ठरल्यामुळे जेट्टीचा उपयोग होत नसल्याचे नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिले. कुमार यांनीच सर्वप्रथम नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटीचा दर्जाची मागणी केली होती. खरंतर नवी मुंबई मनपाचे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी बीएनएचएसच्या सहयोगाने तळ्याची देखभाल करण्याच्या विषयात त्यांना रुची असल्याचे सिडकोला पत्राद्वारे सूचित केले होते. परंतु सिडकोने या कल्पनेला लाल कंदील दाखवला.

आजच्या दुर्दैवी घटनेमुळे स्थलांतरित पक्षी आणि त्यांना अधिवासांचे संरक्षण करण्याच्या महत्त्वावर तीव्र प्रकाशझोत पडला असल्याचे म्हणत कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना सिडकोने डीपीएस तळे सुद्धा बुजण्याआधी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची तसेच जैवविविधतेचे संरक्षण करण्याची विनंती केली आहे.

नवी मुंबईच्या रहिवासी रेखा संखाला यांनी इतर चिंताग्रस्त नागरिकांसोबत जेट्टीवरील बोर्ड तात्काळ काढून टाकण्यासंदर्भात सिडकोला पत्र लिहिण्याचा सल्ला दिला आहे. ठाणे खाडी परिसरातील फ्लेमिंगो पक्षी अभयारण्यात (टीसीएफएस) भरतीची पातळी १५ सेमीच्या पलिकडे गेल्यावर हजारो फ्लेमिंगो नवी मुंबईमधल्या पाणथळ क्षेत्रांकडे धाव घेतात. राज्य कांदळवन फाऊंडेशन आणि बीएनएचएस यांनी टीसीएफएससाठी सॅटेलाइट पाणथळ क्षेत्र व्यवस्थापन आराखडा विकसित केला आहे.

फ्लड लाइटमुळे प्रकाश प्रदूषण

अशाप्रकारची घटना घडल्यास या प्रकरणात शवविच्छेदन होणे आवश्यक आहे, कारण हे पक्षी स्थानिक नसून स्थलांतरित आहेत, त्याचप्रमाणे ते संरक्षित श्रेणीत मोडतात. सिडको पाम बीच रोडवर कमान उभारू शकते आणि डीपीएस रोडच्या टोकाशी लहान चिन्ह लावू शकते, असे नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी म्हटले. आसपासच्या परिसरात असलेल्या फ्लड लाइटमुळे प्रकाश प्रदूषण होते, ज्याचा पक्ष्यांना अतिशय त्रास होतो.

logo
marathi.freepressjournal.in