Navi Mumbai : लेखनिक परवानगीसाठी लाच; सहाय्यक अधीक्षक जाळ्यात

अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यास लेखनिक (रायटर) परवानगी देण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्याच्या निवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक होते.
Navi Mumbai : लेखनिक परवानगीसाठी लाच; सहाय्यक अधीक्षक जाळ्यात
Published on

नवी मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे सव्वा कोटींचे अनुदान लाटल्याप्रकरणी राज्य शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षांसह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यास लेखनिक (रायटर) परवानगी देण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्याच्या निवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक होते.

सुदाम लोटन चव्हाण (५७), सहाय्यक अधीक्षक तथा शाखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय कार्यालय हे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार हे खासगी शिक्षक असून त्यांच्या विद्यार्थ्यास ‘अध्ययन अक्षमता’ असल्याने फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेसाठी लेखनिक देण्याबाबत अर्ज करण्यात आला होता. विद्यार्थ्याच्या आईने तक्रारदारांना अधिकृत अधिकारपत्र देऊन पुढील कामकाज करण्याची विनंती केली होती.

तक्रारदार मंडळाच्या वाशी येथील कार्यालयात गेले असता कर्मचाऱ्यांनी त्यांना २०० रुपयांचा दंड भरून अर्ज करण्यास सांगितले. मात्र दंड भरण्यासाठी गेल्यानंतर आरोपी अधिकाऱ्याने त्यांना बोलावून घेत विद्यार्थ्यास लेखनिक देण्यासाठी तसेच परीक्षेचे विषय बदलून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

याबाबत तक्रारदारांनी १२ तारखेला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांच्याकडे तक्रार केली. १३ तारखेला (शुक्रवारी) शासकीय पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान आरोपीने १० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पुढे तडजोड करून ८ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचेही पडताळणीत स्पष्ट झाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंडळाच्या कार्यालयात सापळा रचला. दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांनी ८ हजार रुपये स्वीकारताना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. संशयिताचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याच्या निवासस्थानी झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in