

नवी मुंबई : स्कुटीवरील दोन तरुणींना धडक देऊन पळून गेलेला स्कोडा चालक डॉ. अनिल बद्रिनाथ कादिया (३४) याचा एपीएमसी पोलिसांनी शोध घेऊन त्याला ठाणे येथून अटक केली आहे. न्यायालयाने डॉ. कादिया याची २ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. रविवारी सकाळी ६.३० च्या सुमारास डॉ. कादिया याने कोपरा गावाजवळ तरुणींच्या स्कुटीला जोरात धडक दिली. या अपघातात स्कुटीचालक तरुणी संस्कृती खोकले व अंजली पांडे या दोघींचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर डॉ. कादिया याने जखमी तरुणींना कुठल्याही प्रकारची मदत न करता, तसेच या अपघाताची माहिती पोलिसांना न देताच पलायन केले होते.
या अपघातातील स्कोडाचालक डॉ. कादिया हा रविवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या कारमधून वाशी येथून ठाण्याच्या दिशेने जात होता. यावेळी तो पामबीच मार्गावरून ठाण्याच्या दिशेने जात असताना, कोपरा पुलाजवळ बोनकोडे येथे स्कुटीवरून जाणाऱ्या दोन तरुणींना त्याने जोरदार धडक दिली होती. त्यात स्कुटीचालक संस्कृतीचा जागीच, तर अंजलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. स्कोडाचालकाने जखमी तरुणींना कुठल्याही प्रकारची मदत न करता, तसेच या अपघाताची माहिती पोलिसांना न देता पलायन केले होते.
बंद सीसीटीव्हीमुळे शोधकार्यात अडचणी
महापालिकेकडून संपूर्ण नवी मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी हा भीषण अपघात झाला, त्या ठिकाणच्या चौकात देखील सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. या अपघातानंतर पळून गेलेल्या कार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर या मार्गावरील बहुतेक सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे या अपघातातील आरोपी कार चालकाचा शोध घेण्यात पोलिसांना बऱ्याच अडचणी आल्या.
नंबरप्लेटचे तुकडे पोलिसांच्या मदतीला
या अपघातातील स्कोडा कारने स्कुटीला जोरात धडक दिल्यामुळे स्कुटीवरील दोन्ही तरुणी या फुटबॉलसारख्या उडाल्या. या धडकेमुळे स्कोडाच्या नंबरफ्लेटचे तुकडे होऊन ते रस्त्यावर पडले. पोलिसांना सीसीटीव्हीतून काहीच मदत न मिळाल्याने अखेर रस्त्यावर पडलेले स्कोडा कारच्या नंबरप्लेटचे तुकडे एकत्र करून त्याद्वारे नंबर जुळवून कारचा शोध घेतला. त्यानंतर सदरची स्कोडा कार ठाण्यातील एमडी डॉक्टरची असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी रविवारी रात्रीच त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले.