
नवी मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आला. या विमानतळाचे उद्घाटन ३० सप्टेंबरला होणार होते, मात्र आता उद्घाटनाच्या तारखेत बदल करण्यात आला असून ७ ऑक्टोबरला उद्घाटन होणार असल्याचे समजते. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी एअर इंडियाचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणार असल्याचे जाहीर झाले आहे.
एअर इंडिया नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १५ शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरू करणार आहे. त्यासाठी सुरुवातीला दररोज एअर इंडियाची २० विमाने नवी मुंबई विमानतळावरून प्रवासी वाहतुकीसाठी उड्डाण घेणार आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेस श्रेणीतील ही विमाने असतील. पुढील वर्षापर्यंत विमान उड्डाणांची संख्या ४० वरून ५५ पर्यंत नेण्याचे नियोजन असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये ५ आंतरराष्ट्रीय विमान सेवांचाही समावेश असेल. २०२६ च्या अखेरपर्यंत ही संख्या ६० पर्यंत वाढवण्याचाही कंपनीचा विचार आहे.
अकासा व इंडिगोही सुरू करणार सेवा
एअर इंडियाबरोबरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणखी दोन विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली असून त्यात अकासा एअर आणि इंडिगो या विमान कंपन्यांचा समावेश आहे.