नवी मुंबई विमानतळावरून ३० लाख प्रवाशांचा प्रवास; ४६ शहरांशी हवाई जोडणीचा विस्तार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यावसायिक विमानसेवा सुरू केल्यापासून ३० लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे.
नवी मुंबई विमानतळावरून ३० लाख प्रवाशांचा प्रवास; ४६ शहरांशी हवाई जोडणीचा विस्तार
नवी मुंबई विमानतळावरून ३० लाख प्रवाशांचा प्रवास; ४६ शहरांशी हवाई जोडणीचा विस्तार संग्रहित छायाचित्र
Published on

उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यावसायिक विमानसेवा सुरू केल्यापासून ३० लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे. अल्पावधीत साध्य झालेला हा महत्त्वपूर्ण टप्पा भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या आणि भविष्यातील महत्त्वाच्या हवाई केंद्रांपैकी एक म्हणून नवी मुंबई विमानतळाची होत असलेली वाटचाल अधोरेखित करणारा आहे.

विमानतळाची सक्षम कार्यक्षमता आणि प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून दिल्या जाणाऱ्या सेवांमुळे हा महत्त्वाचा टप्पा गाठणे शक्य झाले आहे. ऑगस्टमध्ये विमानतळावर सरासरी ९४ टक्के प्रवाशांना त्यांची शेवटची सामानाची बॅग निर्धारित वेळेत मिळाली. ही कामगिरी जागतिक स्तरावरील मानकांशी सुसंगत असून, कार्यक्षम आणि सुरळीत विमानतळ सेवा देण्याच्या विमानतळाच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे. या वाढत्या प्रवासाला आणखी चालना देत नवी मुंबई विमानतळाच्या हवाई मार्गांचे जाळे आता ४० हून अधिक ठिकाणांपर्यंत विस्तारले आहे. मुंबई महानगर प्रदेशाला देशातील प्रमुख शहरांशी जोडण्यात विमानतळाची भूमिका अधिक बळकट होत आहे. जोधपूर आणि सिंधुदुर्गसह नव्या देशांतर्गत ठिकाणांचा विमानतळाच्या हवाई मार्गिकांमध्ये समावेश होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी उपलब्ध प्रवासाचे पर्याय आणि हवाई संपर्क आणखी वाढणार आहे.

‘३० लाख प्रवाशांचा टप्पा पार करणे हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासप्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. विश्वासार्हता आणि प्रवाशांना सुरळीत अनुभव देण्यावर सातत्याने भर आहे. अतिरिक्त हवाई मार्गिका आणि विमान कंपन्यांच्या भागीदारीच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार करताना हवाई संपर्क अधिक बळकट करण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज आहे. पश्चिम भारताचे महत्त्वाचे हवाई प्रवेशद्वार म्हणून स्वतःचे स्थान अधिक भक्कम करण्याच्या दिशेने विमानतळाची वाटचाल सुरू आहे,” असे विमानतळाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

नोव्हेंबर २०२६ मध्ये नव्या विमान कंपन्या आणि हवाई मार्गिकांचा समावेश करून आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काचा आणखी विस्तार करण्याचे विमानतळाचे नियोजन आहे. या नियोजित विस्तारामुळे पश्चिम भारतासाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे आधुनिक प्रवेशद्वार ठरेल.

२२५०० विमान फेऱ्यांची हाताळणी

विमानतळावर व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यापासून हवाई गंतव्यस्थानांची संख्या १३ वरून ४६ पर्यंत वाढली आहे. या कालावधीत विमानतळाने सुमारे २२५०० व्यावसायिक विमानफेऱ्या हाताळल्या आहेत. विमानतळ सुरू झाल्यानंतर २०० दिवसांपेक्षा कमी कालावधीत नवी मुंबईहून अबुधाबीला नियोजित आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू करण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in