नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दाखल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झाला असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले.
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दाखल
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दाखल
Published on

धैर्य गजरा / मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झाला असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले. नवी मुंबईतील हरित क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या विमानतळाला दिवंगत नेते व सामाजिक कार्यकर्ते दिनकर बाळू पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांनी अनेकदा तीव्र आंदोलन आणि पाठपुरावा केल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशासाठी ही एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

मंत्रिमंडळाची २०२२ मध्ये नावाच्या प्रस्तावाला मंजुरी

नवी मुंबईच्या शेतकऱ्यांना, त्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी पाटील यांनी मोठा लढा दिला होता. या जमिनी महाराष्ट्राच्या सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून नियोजित नव्या शहराच्या उभारणीसाठी संपादित करण्यात येणार होत्या. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २०२२ मध्ये या विमानतळाला दिवंगत कार्यकर्त्याचे म्हणजेच दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

खा. सुरेश म्हात्रे यांनी लोकसभेत विचारला प्रश्न

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी संसदेत सांगितले की, महाराष्ट्र विधानमंडळाने मंजूर केलेल्या ठरावासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘लोकनेते डी. बी. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मंत्रालयाला प्राप्त झाला आहे. भिवंडीचे खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोहोळ यांनी ही माहिती दिली. म्हात्रे हे स्थानिक पातळीवर या नामकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

गुरुवारी संसदेत मोहोळ यांनी हेही स्पष्ट केले की, सामान्यतः विमानतळांना ते ज्या शहरात आहे त्या शहराच्या नावानेच ओळखले जाते. मात्र, संबंधित राज्य सरकारने विधानमंडळाच्या ठरावासह वेगळ्या नावाचा प्रस्ताव दिल्यास त्यावर विचार केला जातो. त्यानंतर संबंधित मंत्रालये किंवा विभागांशी सल्लामसलत करून विमानतळाच्या नामकरणाचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेतला जातो.

logo
marathi.freepressjournal.in