नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधीपासून? सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली महत्त्वाची माहिती

या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा २९ मार्च रोजी सुरू होणार होती. मात्र अमेरिका आणि इराण युद्धामुळे हे वेळापत्रक पुढे ढकलावे लागले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळसंग्रहित छायाचित्र
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानभरारीबरोबर आता मे महिन्यापासून परदेशभरारीही घेता येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वास्तविक पाहता या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा २९ मार्च रोजी सुरू होणार होती. मात्र अमेरिका आणि इराण युद्धामुळे हे वेळापत्रक पुढे ढकलावे लागले आहे. या विमानतळावरून दररोज सुमारे ३५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे होणार आहेत, अशी घोषणा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केली आहे.

नवी मुंबई विमानतळावरून २५ डिसेंबर २०२५ पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली. तेव्हापासून या विमानतळाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला या विमानतळावरून दिवसाला सुमारे पाच हजार प्रवासी प्रवास करीत होते. टेक ऑफ आणि लॅण्डिंग करणाऱ्‍या विमानांची संख्याही मर्यादित होती. मात्र आता विमानतळावरून दररोज १६० विमानांचे लॅण्डिंग आणि टेकऑफ होत आहे. विमानतळाचा वापर करणाऱ्‍या प्रवाशांची संख्या थेट २२ हजारांवर पोहोचली आहे. या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा २९ मार्च रोजी सुरू होणार होती. मात्र अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाले. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यात आली नाही. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे ही सेवा मे महिन्यापासून सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले. युद्धजन्य परिस्थितीचा अंदाज घेऊन १५ मे पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

-विमानतळावर दोन धावपट्टींचे नियोजन होते. त्यापैकी पहिली धावपट्टी कार्यरत झाली असून दुसऱ्‍या धावपट्टीचे काम सुरू आहे. या ठिकाणी तिसरी धावपट्टी तयार करण्याची तयारीही सिडकोने सुरू केली आहे.

-तिसरी धावपट्टी तयार करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागाराने आपला अहवाल सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. त्याबाबत सिडकोच्या स्तरावर बैठकही झालेली आहे.

-सल्लागाराचा अहवाल आल्यानंतर जागेचे भूसंपादन, आर्थिक नियोजन या प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत. तिसऱ्या धावपट्टीसाठी सिडकोने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

- नवी मुंबई विमानतळाला प्रवाशांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे टेक ऑफ आणि लॅण्डिंग करणाऱ्‍या विमानाची संख्याही वाढत चालली आहे. विमानतळाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर वर्षाला नऊ कोटी प्रवासी या विमानतळावरून प्रवास करणार आहेत.

नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यापासून या विमानतळाला प्रवाशांची चांगली पसंती मिळाली आहे. हा वाढता प्रतिसाद पाहून सिडकोने तिसरी धावपट्टी साकारण्याची तयारी सुरू केली आहे. ही धावपट्टी तयार झाल्यानंतर विमानतळाची क्षमता वर्षाला १३ कोटी ५० लाख प्रवासी हाताळण्याची होणार आहे. पहिल्या टप्प्यात वर्षाला दोन कोटी प्रवासी विमानतळाचा वापर करणार आहेत.

- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

logo
marathi.freepressjournal.in