
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन फक्त चार दिवसांवर आले असताना, स्थानिक समाजाचा स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या नावावर विमानतळ नामकरणासाठीचा संघर्ष अजूनही सुरू आहे. स्थानिक समाजाने उग्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय नामकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत पुन्हा एकदा स्वर्गीय दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळाला देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दि. बा. पाटील हे सिडको क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना हक्क मिळवून देण्यात यशस्वी लढा देणारे नेते होते. पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई परिसरातील नागरिकांनी अनेक वर्षे या नावासाठी संघर्ष केला. ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार असताना अद्याप दि. बा. पाटील यांचे नाव अंतर्भूत न झाल्याने स्थानिकांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली होती.
बैठकीला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार सुरेश म्हात्रे, आ. मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, माजी आमदार राजू पाटील, सुभाष भोईर, भूषण पाटील, महेंद्र घरत, सुरेश पाटील, जे. डी. तांडेल यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या आश्वासनामुळे आंदोलनाची शक्यता कमी झाली असून, दि. बा. पाटील यांच्या नावाचे विमानतळ नामकरण लवकरच होईल, असे अपेक्षित आहे.
दोन महिन्यांचा कालावधी आवश्यक
मुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान सांगितले की, केंद्र सरकारने नामकरणाच्या निकषात सुधारणा केली असून नवी मुंबई, छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथील तीन विमानतळांच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यामुळे त्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे.