नवी मुंबई विमानतळ नामांतरासाठी भूमिपुत्रांचा हुंकार; दि. बा. पाटलांच्या नामकरणासाठी भव्य कार रॅली

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली रविवारी भिवंडी ते नवी मुंबई कार रॅली काढण्यात आली. या रॅलीला स्थानिक भूमिपुत्र व बहुजन समाज बांधवांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, हजारो नागरिक वाहनांसह सहभागी झाले.
नवी मुंबई विमानतळ नामांतरासाठी भूमिपुत्रांचा हुंकार; दि. बा. पाटलांच्या नामकरणासाठी भव्य कार रॅली
छायाचित्र : दीपक कुरकुंडे
Published on

सुमित घरत/भिवंडी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली रविवारी भिवंडी ते नवी मुंबई कार रॅली काढण्यात आली. या रॅलीला स्थानिक भूमिपुत्र व बहुजन समाज बांधवांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, हजारो नागरिक वाहनांसह सहभागी झाले.

मानकोली-डोंबिवली रस्त्यावर स्व. दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला. केंद्र सरकारने विमानतळ नामकरणाविषयी अजूनही निर्णय न घेतल्याने अस्वस्थता वाढत असल्याची टीका बाळ्या मामा यांनी केली. केंद्राने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा उद्घाटन सोहळा होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहर अध्यक्ष प्रदीप शिर्के यांच्यासह अनेक संस्था व संघटनांचा पाठिंबा मिळाला.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे
छायाचित्र : दीपक कुरकुंडे

रॅलीच्या मार्गावर मानकोली, खारेगाव, कळवा, विटावा आदी ठिकाणी पारंपरिक वेशभूषेत महिलांनी कोळी नृत्य सादर करत रॅलीचे जल्लोषात स्वागत केले. या रॅलीमुळे नवी मुंबई विमानतळ नामकरणाविषयीचा स्थानिकांचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झाला आहे.

यावेळी ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आर. सी. पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेते विश्वास थळे, मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी.के. म्हात्रे, शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख कुंदन पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला जिल्हाध्यक्ष डॉ. रूपाली कराळे, माजी जिल्हा परिषद सदस्या शारदा सुरेश म्हात्रे आदी मान्यवरांसह बहुजन समाजातील मोठी उपस्थिती होती.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ते नवी मुंबई अशी भव्य कार रॅली काढण्यात आली. भूमिपुत्रांच्या अस्मितेशी निगडित या मुद्द्यावर हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत केंद्र सरकारकडे तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी पारंपरिक जल्लोष, कोळी नृत्य आणि घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेले. कार्यक्रमात सर्व वक्त्यांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची मागणी तीव्र करत “ही लढाई शेवटपर्यंत नेऊ” असा निर्धार व्यक्त केला.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे

राजकुमार भगत/उरण

जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तोपर्यंत या विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही, असा ठाम इशारा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी जासई येथे दिला.

दि.बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी ते जासई अशी भव्य कार आणि बाईक रॅली रविवारी खासदार म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली होती.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे

राज्य सरकारने विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव एकमताने केंद्राकडे पाठवला असतानाही मंजुरी न मिळाल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता आहे. या रॅलीत खासदार संजय दिना पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, ९५ गाव प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती अध्यक्ष दशरथ पाटील, शेकाप नेते राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष भावना घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी रॅलीचे स्वागत फुलांच्या वर्षावाने केले. विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याची मागणी तीव्र करत “ही लढाई शेवटपर्यंत नेऊ” असा निर्धार व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in