प्रतीक्षा संपली! Navi Mumbai Airport वरून अखेर विमानसेवा सुरू; पहिल्या विमानाला दिली खास सलामी; प्रवाशांना गिफ्टही - Video

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) अखेर आजपासून (दि.२५) प्रवाशांच्या सेवेत आले आहे. सकाळी ८ वाजता बंगळुरूहून आलेले इंडिगोचे पहिले विमान येथील धावपट्टीवर उतरले.
प्रतीक्षा संपली! Navi Mumbai Airport वरून अखेर विमानसेवा सुरू; पहिल्या विमानाला दिली खास सलामी; प्रवाशांना गिफ्टही - Video
Published on

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) अखेर आजपासून (दि.२५) प्रवाशांच्या सेवेत आले आहे. सकाळी ८ वाजता बंगळुरूहून आलेले इंडिगोचे पहिले विमान येथील धावपट्टीवर उतरले. पहिल्या विमानाचे आगमन झाल्यावर धावपट्टीवर पाण्याचे फवारे उडवून 'वॉटर जेट' (पाण्याच्या तोफांची) सलामी देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर ८.४० च्या सुमारास इंडिगोचे विमान हैदराबादकडे झेपावले आणि विमानतळावरून पहिले-वहिले टेक-ऑफ झाले. पहिल्या उड्डाणाच्या निमित्ताने आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पहिल्या विमानातील प्रवाशांना भेटवस्तूही देण्यात आल्या.

१,५१५ ड्रोनचा नेत्रदीपक ड्रोन शो, आकर्षक हवाई रचनांनी उजळले आकाश

सेवा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला १,५१५ ड्रोनचा एक नेत्रदीपक ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. समन्वयाने उडणाऱ्या या ड्रोननी आकर्षक हवाई रचनांनी आकाश उजळून टाकले, ज्यात थ्रीडी कमळाची फुले, विमानतळाचा लोगो, हरित विमानतळाची दृश्ये, मुंबईवरून उडणारे विमान, Rise of India (भारताचा उदय) अशी प्रतिमा आणि कमळाकृती संकल्पनेवर आधारित आकर्षक टर्मिनल रचना यांचा समावेश होता. या दृश्यांमधून संपूर्ण प्रकल्पाची दृष्टी आणि व्यापकता प्रभावीपणे मांडण्यात आली.

NMIA चे डिझाइन

८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले होते. लंडनस्थित झाहा हदीद आर्किटेक्ट्स यांनी NMIA चे डिझाइन केले आहे. टर्मिनल इमारत कमळाच्या आकारात डिझाइन करण्यात आली आहे, जे तरंगत्या कमळासारखे दिसते. मध्यभागी बारा विशाल शिल्पात्मक स्तंभ आहेत, जे उघड्या पाकळ्यांसारखे भासतात. या डिझाईनसाठी अजिंठा-वेरुळ लेण्यांच्या वास्तुकलेतून प्रेरणा घेतलेली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक आहे. अत्याधुनिक सुविधा, टिकाऊ पायाभूत रचना आणि हरित संकल्पनेवर आधारित डिझाइन हे याचे वैशिष्ट्य आहे.

या विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार असून, मुंबई महानगर प्रदेशाला दोन विमानतळांचा लाभ मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक विमानतळ पायाभूत सुविधांचा मानदंड ठरला असून पुणे, ठाणे, पनवेल, रायगड तसेच कोकणातील इतर भागांतील नागरिकांनाही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी मोठा लाभ मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in