दिबांचे नाव नाही, तर विमानतळाचे उद्घाटन नाही; ६ ऑक्टोबरला भूमिपुत्रांचा धडक मोर्चा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनापूर्वीच वातावरण तापले आहे. भूमिपुत्रांनी इशारा दिला आहे की, विमानतळाला राष्ट्रीय नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर उद्घाटन होऊ देणार नाहीत. यासाठी येत्या ६ ऑक्टोबरला भूमिपुत्रांच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे.
दिबांचे नाव नाही, तर विमानतळाचे उद्घाटन नाही; ६ ऑक्टोबरला भूमिपुत्रांचा धडक मोर्चा
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जशी जवळ येत आहे तसे वातावरण आणखी तापत आहे. नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे. विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे यासाठी येत्या ६ ऑक्टोबरला भूमिपुत्रांच्या वतीने एक धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत रविवारी कोपरखैराणे येथे बैठक पार पडली असून यावेळी ६ ऑक्टोबरच्या मोर्चाचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात उशीर केला जात असून केंद्राकडून अजून अंतिम अधिसूचना काढली जात नाही. त्यामुळे येथील भूमिपुत्रांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला असून या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी रविवारी कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिरमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी सुरेश म्हात्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे देण्यात यावे अशी समस्त भूमिपुत्रांची मागणी असून तसा ठराव देखील राज्य सरकारने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. विमानतळाचे उद्घाटन येत्या ८ किंवा ९ ऑक्टोबरला होणार असून विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव असेल असे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मात्र सदर प्रस्ताव केंद्राकडे असून तीन वर्षे होत आली तरी अद्याप त्यावर निर्णय घेतला जात नाही. असे असताना उद्घाटनाचा घाट घातला जात आहे. त्यामुळे केंद्राने जर उद्घाटनाआधी विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर केले तर आम्ही त्यांचे स्वागत करू. नाव जाहीर न करताच उद्घाटन केले तर संघर्ष अटळ आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे देण्यात यावे यासाठी येत्या ६ ऑक्टोबरला विमानतळावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जवळपास लाख भूमिपुत्र सामील होतील अशी सांगण्यात आले. मोर्चात सहभागी होण्यासाठी सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्र संघटना आणि प्रतिनिधींना कळवण्यात आले आहे, अशी माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in