
मुंबई : नवी मुंबई विमानतळ हे मुंबईशी बोगद्याने जोडता येईल का? याची व्यवहार्यता तपासून विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी एमएमआरडीएसला दिले आहेत.
एमएसआरडीसी कार्यालयात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई विमानतळ हे मुंबईतले दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. या विमानतळाची प्रवासी क्षमता वर्षाला दोन कोटी असेल. साहजिकच या विमानतळासाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करतील. सध्या जे मार्ग आहेत ते अपुरे पडण्याची शक्यता आहे. या विमानतळाची राष्ट्रीय महामार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक नेटवर्कशी अखंड जोडणी करणे गरजेचे ठरणार असून यादृष्टीने सध्याचा सी लिंक, बीकेसी ते नवी मुंबई विमानतळ असा बोगदा करता येतो का याची चाचपणी करण्यास उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.