
डोंबिवली : देशभरातील ४० विमानतळाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव लागणार असून केंद्र सरकाराकडे दुसरे नाव नाही, असे माजी खासदार संजीव नाईक यांनी शनिवारी डोंबिवलीत सांगितले. दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समिती आणि अखिल भारतीय आगरी समाज परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात दि. बा. पाटील योद्धा सन्मान पुरस्कार सोहळा पडला. यावेळी माजी खासदार संजीव नाईक बोलत होते.
कृती समिती अध्यक्ष दशरथ पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार त्यांची भेट घ्या. अखिल आगरी समाज परिषदेचा यात सिंहाचा वाटा आहे. यावेळी अखिल आगरी समाज परिषदेचे आगरी दर्पण मासिकाचे प्रकाशन मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले. पुढे खासदार संजीव नाईक म्हणाले की, नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव हा पंतप्रधानांच्या कार्यालयाने अंतिम कॅबिनेट मंजुरीसाठी ठेवला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याच्या अनुषंगाने जो प्रलंबित प्रश्न आहे. तसाच देशातील ४० अशा विमानतळाला नामकरण करण्याच्या संदर्भात काही प्रस्ताव त्या त्या राज्यातून आले आहेत. राज्य सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही नाव आलेले नाही.
ही आपल्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. माजी मंत्री कपील पाटील यांनी विमानतळाच्या नावाबाबतच्या आपल्या प्रस्तावावर काहीही अडचण येणार नाही. फक्त आपले शिष्टमंडळ तिथंपर्यत जाणे गरजेचे आहे. पण आपल्या सर्वांच्या एकत्रितपणे आल्याने आपल्या ताकदीने दि. बा. पाटील यांचेच नाव लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री कपील पाटील, खासदार संजीव नाईक, जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार राजेश मोरे, माजी आमदार सुभाष भोईर, ठाकरेंची शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक नितीन पाटील, काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे, माजी सरपंच उपस्थित होते.
भूमिपुत्रांनाच नोकऱ्या देणे आवश्यक
भूमिपुत्रांना प्राधान्य देत नोकरी, व्यवसाय देणे आवश्यक आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्याच लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. आपण जर कठोर भूमिका घेत नाही तर मात्र आपण कमी पडू, भूमिपुत्रांच्या पाठीशी आपण उभे राहणे, आवश्यक असल्याचे माजी खासदार संजीव नाईक यावेळी म्हणाले.