नवी मुंबई : येत्या काही दिवसांत कार्यान्वित होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे परिसरात वाहतुकीचे प्रचंड आव्हान उभे राहणार आहे. यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा स्थापन करून १७७ पदनिर्मिती करण्याची मागणी नवी मुंबई पोलिसांनी केली आहे. तसेच विमानतळ पोलीस ठाण्यासाठी १०८ पदे तातडीने मंजूर करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले असून, या संदर्भात पोलीस आयुक्तालयाकडून सविस्तर प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे.
विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर ४ प्रवासी टर्मिनल, २ धावपट्ट्या, १ ट्रक टर्मिनल, कार्गो हब, विमान कंपन्यांची कार्यालये, बँका, हॉटेल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच संरक्षण व हवामान विभागाशी संबंधित आस्थापना उभारल्या जाणार आहेत. परिणामी देश-विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल तसेच मालवाहतुकीतही मोठी भर पडेल. अंदाजे ९ कोटी प्रवासी व ३६० कोटी मेट्रिक टन मालवाहतूक प्रतिवर्ष या विमानतळातून होणार आहे.
पूर्वी विमानतळ पोलीस ठाण्यासाठी २१६ पदांचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता. मात्र वित्त विभागाने पहिल्या टप्प्यात ५० टक्के म्हणजे १०८ पदे मंजूर करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे पोलिसांनी विमानतळ पोलीस ठाण्यासाठी १०८ पदे आणि वाहतूक शाखेसाठी १७७ पदे तातडीने मंजूर करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर परिसरात वाहतुकीचा प्रचंड ताण वाढणार आहे. परिणामी वाहतूककोंडी व सुरक्षिततेच्या समस्या निर्माण होणार आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा स्थापन करून आवश्यक १७७ पदे तसेच विमानतळ पोलीस ठाण्यासाठी १०८ पदे तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
संजयकुमार पाटील (पोलीस उपायुक्त, मुख्यालय)
३९५ नवीन पदांची आवश्यकता
खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोली, रोडपाली, पळस्पे, पनवेल, करंजाडे, उलवे, उरण, द्रोणगिरी परिसरात उभारल्या जाणाऱ्या बांधकाम प्रकल्पांमुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या भागांमध्ये भविष्यात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विमानतळ पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखा मिळून एकूण ३९५ नवीन पदांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
वाहतुकीवरील ताण वाढणार
ठाणे, तुर्भे, बेलापूर, तळोजा औद्योगिक वसाहती, जेएनपीटी बंदर, अटल सेतू, प्रस्तावित कोस्टल रोड, ४ मेट्रो मार्ग, लोकल रेल्वे आणि हायस्पीड रेल्वे यामुळे विमानतळ परिसरात वाहतुकीचा प्रचंड ताण येणार आहे. परिणामी वाहतूक कोंडी व सुरक्षिततेच्या समस्या उद्भवू शकतात. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र वाहतूक शाखेची स्थापना अत्यावश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.