नवी मुंबईतील एपीएमसी फळ विभागात कलिंगडची आवक वाढली आहे. तापमान वाढेल तसा कलिंगडचा हंगाम बहरत चालला आहे. बाजारात कलिंगडची दररोज ८० ते १०० टन आवक होत आहे. ही आवक मागील १५ दिवसाच्या तुलनेत दुप्पटहून अधिक आहे. भावातही १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे मागणी जोरदार आहे तसेच, मुस्लीम धर्मीयांचा रमजान असल्यामुळे उपवास सोडण्यासाठी कलिंगड, खरबूज अशा रसाळ फळांना अधिक मागणी असते. मंगळवारपासून रमजान महिन्याला प्रारंभ झाल्यानंतर यामहिन्यात कलिंगडच्या मागणीत वाढ होईल, अशी माहिती मार्केटमधील फळ व्यापाऱ्यांनी दिली.
कलिंगडचा हंगाम जून महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. रायगड, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा तसेच पुणे जिल्ह्यात कलिंगडची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कलिंगडच्या सबा, मेलडी, मॅक्स या जाती आहेत. आकाराने छोटे आणि चवीला गोड असणाऱ्या कलिंगडना मागणी चांगली आहे. ज्यूस विक्रेत्यांकडून कलिंगडच्या मागणीत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात एक किलो कलिंगडचे भाव प्रतवारीनुसार ८ ते २० रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकी कलिंगडला अधिक मागणी
कर्नाटकातील बंगळुरू भागात नामधारी कलिंगडची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. नामधारी कलिंगड आकाराने गोल आणि मोठे असते. नामधारी कलिंगडना फळ विक्रेते तसेच ज्यूस सेंटरचालकांकडून मागणी असते. घरगुती ग्राहक छोट्या आकाराचे कलिंगड खरेदी करत असल्याचे फळ व्यापाऱ्यांनी सांगितले.
रमजानमध्ये कलिंगडची उच्चांकी आवक
रमजान महिन्यात कलिंगडच्या मागणीत मोठी वाढ होते. रमजान रोजा सोडण्यासाठी सायंकाळी आंबा, चिकू, अननस, पपई आणि कलिंगड या फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी माल राखून ठेवतात. ८० ते १०० टन आवक होत असते. रमजान महिना सुरू झाल्याने ही आवक १५० ते २०० टनपर्यंत पोहोचल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
रमजान महिन्यापर्यंत आंब्याचे दर आवाक्याबाहेर
दरम्यान, रमजान महिन्यात फळांची मागणी वाढली असली तरी रमजान महिना संपेपर्यंत हापूस आंब्याचे दर हे सामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहतील, नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दररोज १५०० टन हापूस आंब्याचा माल येत आहे. मात्र तरी किरकोळ बाजारात हापूस आंब्याचे दर १५०० ते २००० रुपये डझनपर्यंत आहे. तर रमजान महिन्याच्या शेवटी म्हणजे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हापूस आंब्याचे दर कमी होतील, असे एका आंबे विक्रेत्याने सांगितले.