Navi Mumbai : बेलापूर टेकड्यांवर भूस्खलनाचा धोका; धोकादायक बांधकामांवर कारवाईसाठी पर्यावरणप्रेमींची मानवी साखळी

नवी मुंबईतील बेलापूर टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेल्या बेकायदा धार्मिक स्थळांमुळे भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला असून, सुमारे २०० हून अधिक धोकादायक बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक व विविध संस्थांनी केली आहे.
बेलापूर टेकड्यांवर भूस्खलनाचा धोका; धोकादायक बांधकामांवर कारवाईसाठी पर्यावरणप्रेमींची मानवी साखळी
बेलापूर टेकड्यांवर भूस्खलनाचा धोका; धोकादायक बांधकामांवर कारवाईसाठी पर्यावरणप्रेमींची मानवी साखळी
Published on

नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेल्या बेकायदा धार्मिक स्थळांमुळे भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला असून, सुमारे २०० हून अधिक धोकादायक बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक व विविध संस्थांनी केली आहे.

पर्यावरणवादी संघटनांनी रविवारी सकाळी बेलापूरच्या मुख्य चौकात मानवी साखळी तयार करून अनियंत्रित व बेकायदेशीर बांधकामांपासून संवेदनशील टेकड्यांचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला. या आंदोलनात नवी मुंबई, मुंबई, मालाड व उरण परिसरातील पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेलापूर टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांनी मुसळधार पावसात माती घसरणे, रिटेनिंग वॉल कोसळणे आणि दगड खाली घसरण्याच्या घटना नोंदवल्या आहेत. सेव्ह बेलापूर हिल्स फोरमचे कपिल कुलकर्णी यांनी सांगितले की, सुमारे ६०० हून अधिक घरे या धोकादायक उतारांच्या खाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पर्यावरणप्रेमींनी १९ जुलै २०२३ रोजी इर्शाळवाडी येथे झालेल्या भूस्खलनाचा उल्लेख करत इशारा दिला की, वेळेत प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास बेलापूरमध्येही तत्सम दुर्घटना घडू शकते. नोव्हेंबर २०२२ मध्ये आयोगाने माध्यमातील वृत्तांवरून स्वतःहून दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावले होते. न्यायालयांच्या स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांनंतरही कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

गुगल अर्थच्या छायाचित्रांनुसार २०१९ मध्ये हिरवाईने नटलेल्या टेकड्यांवर २०२५ पर्यंत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे बेलापूर टेकड्यांवरील बेकायदा व धोकादायक बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळीच्या माध्यमातून केली.

२.३ लाख चौरस फूट सार्वजनिक जागेवर अतिक्रमण

सेव्ह बेलापूर हिल्स फोरम आणि नॅटकनेक्ट फाऊंडेशन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भूस्खलनप्रवण उतारांवर उभ्या असलेल्या सुमारे ३० अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनाच्या दीर्घकालीन निष्क्रियतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. माहिती अधिकारातून सिडकोकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बांधकामे सुमारे २.३ लाख चौरस फूट सार्वजनिक जागेवर पसरलेली आहेत. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून जमीन सपाट केल्यामुळे टेकडीची माती सैल झाली असून भूस्खलनाचा धोका अधिक वाढला आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगासमोर पाडकामाचे आदेश दिल्यानंतरही ही बांधकामे वाढत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. गेल्या दोन वर्षांत पर्यावरणप्रेमींचे हे तिसरे आंदोलन असून, एप्रिल २०२४ व फेब्रुवारी २०२५ मध्येही याच मागण्यांसाठी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले होते.

आम्ही कोणत्याही रचना किंवा समुदायाच्या विरोधात नाही. आमची चिंता येथे येणाऱ्या भाविकांची आणि टेकडीखाली राहणाऱ्या कुटुंबांच्या सुरक्षेबाबत आहे. कधीही भूस्खलन होण्याचा धोका कायम असून, श्रद्धेलाही सुरक्षित जागा हवी, अस्थिर उतार नको. सिडकोने तत्काळ कारवाई करावी.

बी. एन. कुमार, नॅटकनेक्ट फाऊंडेशन

उताराच्या काही भागांवर मोठी झोपडपट्टी उभी राहिल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबेही धोक्यात आली आहेत. धोका कोणालाही वेगळा पाहत नाही, कारण माती भेदभाव करत नाही. कारवाई न केल्यास मानवी आपत्ती निर्माण होऊ शकते.

सुधीर दाणी, सजग नागरिक मंच

पर्यावरणप्रेमींचा विरोध धार्मिक स्थळांना नसून पर्यावरणाच्या ऱ्हासाला व भविष्यातील सजीवसृष्टीवर होणाऱ्या दुष्परिणामांना आहे.

सुदर्शन कर्नावट

logo
marathi.freepressjournal.in