नवी मुंबईत एबी फॉर्मवरून खळबळ

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस असताना भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला आहे.
नवी मुंबईत एबी फॉर्मवरून खळबळ
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस असताना भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला आहे.

मनपा निवडणुकीसाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी मागणी केलेल्या २० पैकी १३ जागांवर पक्षाने उमेदवारी दिली आहे. मात्र या १३ उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्मवर आवश्यक सही न दिल्याने आमदार म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट गणेश नाईक यांच्यावर तोफ डागली.

आम्ही महायुती होणार म्हणून काम करत होतो. काल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आम्ही १११ जागांची मागणी केलेली नव्हती, तर ज्या ठिकाणी भाजपचे नगरसेवक नाहीत अशा २० जागांची मागणी केली होती. मात्र माझा मुलगा निलेश म्हात्रे याला उमेदवारी दिल्याने कदाचित काही लोक नाराज झाले असावेत. काल संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत मी संजीव नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. यानंतर जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी १३ एबी फॉर्म दिले, पण त्यावर सही नव्हती. ‘फॉर्म भरा, सकाळी सही करतो,’ असे त्यांनी सांगितले. माझ्या मुलाला पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे इतर उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून माझ्या मुलाने स्वतःहून माघार घेतली आहे. याची दखल पक्ष घेईल, अशी मला अपेक्षा आहे.

मंदा म्हात्रे, आमदार भाजप

भाजपमध्ये सर्व निर्णय एक मताने घेतले जातात. ही प्रक्रिया मंदा म्हात्रे यांनाही माहिती आहे. त्यांची भेट घेतली जाईल. काय नाराजी आहे हे समजून घेतली जाईल. त्या ज्येष्ठ नेत्या आहेत.

संजीव नाईक (माजी खासदार निवडणूक प्रभारी )

मंदा म्हात्रे यांनी दिलेली नावे ही भाजपच्या यादीत नव्हती. त्यामुळे मी त्या नावांवर सही केली नाही. यादी ही वरिष्ठ पातळीवर ठरवली जाते. ८५७ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. जिल्हा पातळीवर ही यादी ठरवली जात नाही.

डॉ. राजेश पाटील (जिल्हाध्यक्ष भाजप नवी मुंबई)

logo
marathi.freepressjournal.in