

मुंबई : नवी मुंबईच्या वाशी येथून अर्ज फेटाळण्यात आलेले भाजप उमेदवार निलेश भोजने यांना गुरूवारी उच्च न्यायालयाने दिलासा देताना वाशी येथील प्रभाग क्र. '१७-अ'मधील निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांचा कायदेशीररित्या आणि मनमानीपणे वापर केल्याचे मत यावेळी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने व्यक्त केले आणि याचिकेवर सुनावणी घेण्यास काहीही हरकत नाही, असे निरिक्षण नोंदवत याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले.
शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या तक्रारीनंतर अर्ज फेटाळला
भोजने यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करत शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या तक्रारीवरून भोजने यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. हे कलम केवळ विद्यमान नगरसेवकाला लागू होते, उमेदवाराला नाही, असा दावा करत भोजने यांनी या निर्णयाला आव्हान दिले होते. भोजने यांच्यावतीने ज्येष्ठ वकील नवरोज सेरवई यांनी युक्तिवाद केला. त्यावर प्रथमदर्शनी ही कारवाई योग्य पद्धतीने झाली नसल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आणि निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्याचसोबत, राज्य निवडणूक आयोग, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, मुख्य निवडणूक अधिकारी आणि नवी मुंबई निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रभाग क्रमांक १७अ च्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीबाबत पुढील कोणतीही कार्यवाही करू नये, असेही स्पष्ट केले.
भोजनेंचा अर्ज बाद होताच भाजपचा अपक्ष उमेदवाराला पाठिबा
भोजनेंचा अर्ज बाद होताच भाजपने या प्रभागातील अपक्ष उमेदवार दर्शन भोईर यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आणि शिंदे गटाविरोधात आपला पॅनल उभा केला आहे. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोण काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.