Navi Mumbai :पालिकेच्या भाजप गटनेतेपदी सागर नाईक; ६६ नगरसेवकांची कोकण भवनात नोंदणी

Navi Mumbai :पालिकेच्या भाजप गटनेतेपदी सागर नाईक; ६६ नगरसेवकांची कोकण भवनात नोंदणी

भाजपच्या गटनेतेपदी माजी महापौर सागर नाईक यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली असून, २३ जानेवारी रोजी कोकण भवन येथे भाजपच्या ६६ नगरसेवकांची अधिकृत गटनोंदणी करण्यात आली.
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच भारतीय जनता पक्षाने आपला गटनेता निश्चित केला आहे. भाजपच्या गटनेतेपदी माजी महापौर सागर नाईक यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली असून, २३ जानेवारी रोजी कोकण भवन येथे भाजपच्या ६६ नगरसेवकांची अधिकृत गटनोंदणी करण्यात आली.

या वेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी महापौर सागर नाईक, अभिजीत पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल गेल्या शनिवारी जाहीर झाले. नामदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपने ६५ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे.

नवी मुंबई महापालिकेत भाजपचा गटनेता म्हणून माजी महापौर सागर नाईक यांची निवड करण्यात आली असून, कोकण भवन येथे ६६ नवनिर्वाचित नगरसेवकांनी अधिकृत गटनोंदणी केली. प्रभाग क्रमांक १४-ड मधून निवडून आलेले अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजपचे संख्याबळ ६६ वर पोहोचले आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना माजी खासदार संजीव नाईक म्हणाले की, सर्वसंमतीने सागर नाईक यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

नाईकांच्या नेतृत्वातच नवी मुंबईचा विकास होणार

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सागर नाईक यांनी सहकारी नगरसेवकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई शहराचा विकास अधिक उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. महापौरपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नामदार गणेश नाईक आणि वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर होईल, अशी माहिती त्यांनी दिली. अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत बोलताना सागर नाईक म्हणाले की, १४ गावांचा विकास गणेश नाईक यांच्या नेतृत्वातच होईल, असा विश्वास येथील जनतेला असल्याने भरत भोईर भाजपसोबत आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in