सिडकोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी पैशांची मागणी? व्हॉट्सॲप मेसेजमुळे खळबळ, व्यवस्थापनाकडून चौकशी सुरू

एकीकडे नवी मुंबई महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीत पैसे घेतल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सिडकोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये देखील पैशांची डिमांड केली जात असल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे.
सिडकोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी पैशांची मागणी? व्हॉट्सॲप मेसेजमुळे खळबळ, व्यवस्थापनाकडून चौकशी सुरू
Published on

नवी मुंबई : सिडकोतील मलईदार विभागात बदलीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी दोन ते अडीच लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा मेसेज सिडकोतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल झाल्यामुळे सिडकोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या वादात सापडल्या आहेत. या व्हायरल मेसेजमध्ये पैसे घेणाऱ्या अथवा देणाऱ्या व्यक्तीचे नाव नसले तरी देखील या मेसेजची व्यवस्थापनाने दखल घेतली असून चौकशी केली जात असल्याचे सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक -१ राजा दयानिधी यांनी सांगितले.

दरम्यान, अशा प्रकारच्या कुठल्याही मेसेजला कर्मचाऱ्यांनी बळी न पडता ज्या कर्मचाऱ्यांकडे अशा प्रकारची डिमांड कोणी केली असेल तर त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महापालिकेतील १२ कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीत पैसे घेतल्याचा आरोप प्रशासनावर करण्यात आला होता. सदर आरोपाची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीला स्थगिती देत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांची या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित केली होती.

एकीकडे नवी मुंबई महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीत पैसे घेतल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सिडकोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये देखील पैशांची डिमांड केली जात असल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे साडेबारा टक्के योजना विभागात काम करणाऱ्या एका कार्यालयीन सहाय्यकाद्वारे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे फोन करून पैशांची डिमांड केली जात असल्याचा मेसेज सिडको अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर फिरू लागल्याने सिडको वर्तुळात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान, या व्हायरल मेसेजबाबत सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी यांच्याकडे देखील काही कर्मचाऱ्यांनी तक्रार नमूद केली आहे. त्यामुळे दक्षता विभागाकडून देखील या व्हायरल मेसेजप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे.

मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी देखील याबाबत तपास सुरू असल्याचे नमूद केले. तसेच असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बदल्या अथवा पदोन्नती या पारदर्शक व नियमानुसारच केल्या जातील. त्याकरिता कोणीही पैशांची डिमांड करत असल्यास त्याबाबत तत्काळ व्यवस्थापनाला संपर्क साधण्याचे आवाहन राजा दयानिधी यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in