

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ‘टांगा पलटी’ करण्याचे आव्हान गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे या मातब्बर नेत्यांनी परस्परांना दिल्यामुळे निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचली होती. त्यातच आता महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीतही राजकीय चुरस पाहायला मिळेल, अशी आशा होती. मात्र नाट्यमय घडामोडींनंतर निवडणूक न होता भाजपच्या उमेदवारांची निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेची सूत्रे पूर्णपणे भाजपच्या हाती गेल्याचे स्पष्ट झाले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील, तर उपमहापौरपदी दशरथ भगत हे बिनविरोध निवडून आले. महापौरआणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट राजकीय लढत होण्याची शक्यता होती. शिवसेनेच्यावतीने दोन्ही पदांसाठी उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार झाली होती. मात्र, भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही ही लढत चर्चेचा विषय ठरली होती.
निवडणुकीच्या दिवसाआधी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना शिंदे गटाकडून महापौरपदासाठी दाखल करण्यात आलेला नामांकन अर्ज मागे घेण्यात आला, त्यामुळे भाजपच्या उमेदवार सुजाता पाटील यांची बिनविरोध महापौरपदी निवड झाली. यानंतर उपमहापौरपदासाठीही शिंदे गटाने नामांकन अर्ज मागे घेतला, त्यामुळे भाजपचे उमेदवार दशरथ भगत हे बिनविरोध उपमहापौर म्हणून निवडून आले.