नवी मुंबई पुरस्कारात स्वच्छ, वस्त्यांमध्ये अस्वच्छ! देशपातळीवरील पुरस्कारावर प्रश्नचिन्ह; मुख्य रस्ते चकाचक, अंतर्गत कचऱ्याचे ढीग

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’मध्ये नवी मुंबई महापालिकेने देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे शहरात आनंदाचे वातावरण असले, तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांमध्ये अस्वच्छतेचे चित्र कायम असल्याने नागरिकांकडून या पुरस्काराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नवी मुंबई पुरस्कारात स्वच्छ, वस्त्यांमध्ये अस्वच्छ! देशपातळीवरील पुरस्कारावर प्रश्नचिन्ह; मुख्य रस्ते चकाचक, अंतर्गत कचऱ्याचे ढीग
नवी मुंबई पुरस्कारात स्वच्छ, वस्त्यांमध्ये अस्वच्छ! देशपातळीवरील पुरस्कारावर प्रश्नचिन्ह; मुख्य रस्ते चकाचक, अंतर्गत कचऱ्याचे ढीग'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

नवी मुंबई : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’मध्ये नवी मुंबई महापालिकेने देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे शहरात आनंदाचे वातावरण असले, तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांमध्ये अस्वच्छतेचे चित्र कायम असल्याने नागरिकांकडून या पुरस्काराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकीकडे देशपातळीवर स्वच्छतेचा गौरव होत असताना दुसरीकडे बेलापूरपासून ऐरोली-दिघ्यापर्यंत अनेक भागांत कचऱ्याचे ढीग, तुंबलेली गटारे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वच्छतेचा ‘नंबर वन’ किताब मिळविणाऱ्या शहरातील प्रत्यक्ष परिस्थिती नेमकी काय आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

नवी मुंबईला स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल स्थान मिळवून देण्यात ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे प्रतिबिंब शहरातील प्रत्येक भागात दिसणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी अस्वच्छतेची समस्या कायम आहे.

तुर्भे स्टोअर्स, इंदिरानगर, हनुमाननगर, चिंचपाडा, रबाळे, पावणे, अडवली-भुतावली, दिवागाव, नेरुळ, सारसोळे, बेलापूर, सानपाडा आणि कोपरी यांसह विविध गावठाणे व झोपडपट्टी परिसरांत कचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर बनली आहे. काही ठिकाणी कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत, तर अनेक भागांतील गटारे तुंबलेली आहेत. परिणामी, सांडपाणी आणि कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढत आहे.

पुरस्कार टिकविण्याचे आव्हान

देशपातळीवरील स्वच्छतेचा पुरस्कार मिळविणे ही नवी मुंबईसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. मात्र, हा प्रथम क्रमांक टिकविण्यासाठी केवळ सर्वेक्षणापुरती स्वच्छता न करता वर्षभर सातत्यपूर्ण काम करणे आवश्यक आहे. मुख्य रस्ते आणि महत्त्वाच्या चौकांपुरती स्वच्छता मर्यादित न ठेवता बेलापूरपासून दिघ्यापर्यंतच्या सर्व नोडमधील गावठाणे, झोपडपट्ट्या, औद्योगिक क्षेत्रे आणि खाडीकिनाऱ्यांवरही समान लक्ष देणे गरजेचे आहे. शहराला मिळालेला स्वच्छतेचा पुरस्कार प्रत्यक्षात प्रत्येक गल्ली, वस्ती आणि परिसरात दिसून आला, तरच नवी मुंबई खऱ्या अर्थाने देशातील स्वच्छ शहर म्हणून आपला लौकिक टिकवू शकेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

अंतर्गत वस्त्यांकडे दुर्लक्ष

स्वच्छता सर्वेक्षणाच्या काळात महापालिका प्रशासनाकडून पामबीच मार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता, उद्याने आणि महत्त्वाच्या चौकांच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. मात्र, शहरातील अंतर्गत वस्त्या आणि नागरी वसाहतींच्या स्वच्छतेकडे तुलनेने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. बेलापूर, नेरूळ, सीवूड्स, सानपाडा, जुहूगाव, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या सर्वच नोडमधील अंतर्गत रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. नियमित कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)