नवी मुंबईत CNG पुरवठा ठप्प; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

शहरातील सीएनजी गॅसचा पुरवठा रविवारी रात्रीपासून पूर्णपणे ठप्प झाल्याने पनवेल ते ऐरोलीपर्यंत सर्व प्रमुख पंपांवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. सीएनजी भरण्यासाठी अनेक ऑटोरिक्षा, टॅक्सी तसेच खासगी वाहनधारक तासन‌्तास प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र सोमवारी सकाळपासून स्पष्टपणे दिसून येत आहे.
नवी मुंबईत CNG पुरवठा ठप्प; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
नवी मुंबईत CNG पुरवठा ठप्प; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
Published on

नवी मुंबई : शहरातील सीएनजी गॅसचा पुरवठा रविवारी रात्रीपासून पूर्णपणे ठप्प झाल्याने पनवेल ते ऐरोलीपर्यंत सर्व प्रमुख पंपांवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. सीएनजी भरण्यासाठी अनेक ऑटोरिक्षा, टॅक्सी तसेच खासगी वाहनधारक तासन‌्तास प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र सोमवारी सकाळपासून स्पष्टपणे दिसून येत आहे.

महानगर गॅस लिमिटेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेलच्याच्या मुख्य गॅस पाईपलाइनला चेंबूर-ट्रॉम्बे परिसरात नुकसान झाल्यामुळे पुरवठा ठप्प झाला आहे. वडाळा येथील ‘सिटी गेट स्टेशन’द्वारे नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईतील सीएनजी पंपांना गॅसपुरवठा केला जातो. मात्र पाईपलाइन तुटल्यामुळे महानगर गॅसने घरगुती वापरकर्त्यांना प्राधान्य देत सीएनजीचे वितरण तात्पुरते थांबवले आहे. पाईपलाइनची दुरुस्ती सुरू असली तरी पुरवठा केव्हा सुरळीत होईल याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या पुरवठा बंदीमुळे सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या मते, गॅस उपलब्ध न झाल्यास वाहतूक सेवा बाधित होऊ शकते आणि वर्दळीच्या वेळेत प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागू शकते. महानगर गॅसने औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना तात्पुरते पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सार्वजनिक वापरासाठीचा सीएनजी पुरवठा कधी सुरू होईल, याबाबत अनिश्चितता कायम आहे.

वाहनचालकांना सर्वाधिक फटका

पुरवठा ठप्प झाल्याचा सर्वाधिक फटका नवी मुंबईतील सीएनजी वाहनचालकांना बसला आहे. वाशी, नेरूळ, बेलापूर, घणसोली, ऐरोली, तुर्भे, पनवेल या भागांतील पंपांवर पहाटेपासूनच वाहनांची गर्दी पहायला मिळाली. काही पंपांवर शेकडो वाहने रांगेत उभी असून चालकांना अनेक तास गॅस मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. 'काल रात्रीपासून गॅस मिळत नाहीये. दिवसभर गाडी कशी चालवायची?' असा सवाल रिक्षाचालकांकडून करण्यात येत आहे. अनेक चालकांनी सीएनजीअभावी आजचा दिवस वाया गेल्याचे सांगितले.

ठाण्यातील रिक्षा-टॅक्सी वाहतुकीवर परिणाम

ठाणे : वडाळ्यातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाइनमध्ये आलेल्या बिघाडामुळे ठाणे परिसरातील सीएनजी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. अचानक बंद झालेल्या पुरवठ्यामुळे ठाण्यातील अनेक सीएनजी पंपांनी सेवा थांबवली असून रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुरवठा खंडित झाल्याने खोपट आणि इंदिरानगर सीएनजी पंपांवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. गेल गॅसच्या तांत्रिक पथकाकडून पाईपलाइन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in