नवी मुंबई : गणेशोत्सवाचे वेध लागताच सर्वसामान्यांच्या किचन बजेटला महागाईची झळ बसू लागली आहे. आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) वाशी येथील फळ आणि मसाला बाजारात नारळाची आवक घटल्याने दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा होलसेलसह किरकोळ बाजारात नारळाच्या दरात प्रति नगामागे १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. सुक्या खोबऱ्याचे भाव १० ते २० टक्क्यांनी वधारले आहेत.
भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतींपाठोपाठ आता धार्मिक विधी आणि पुजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणाऱ्या नारळाच्या दरात प्रति नग १५ ते २० रुपयांनी वाढ झाली. येते २ ते ३ महिने दर असेच चढे राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या सणासुदीच्या काळात घराघरांत पूजेसाठी तसेच नैवेद्य आणि मिठाई बनवण्यासाठी नारळाला मोठी मागणी असते. मात्र, याच काळात दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
किरकोळ बाजारात नारळ ४० ते ६० रुपयांवर
यापूर्वी किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपयांना मिळणारा नारळ आता ४० ते ६० रुपयांवर पोहोचला आहे. नारळाच्या आकारानुसार आणि गुणवत्तेनुसार एका नारळामागे १५ ते २० रुपयांची थेट वाढ झाली आहे. एकंदरीतच गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी असे मोठे सण एकामागून एक येत असल्याने पुढील २ ते ३ महिने नारळाचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे. सणासुदीच्या काळातच वाढलेल्या या दरांमुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच कात्री लागत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे.
दक्षिण भारतातून आवक सुरू, तरीही तुटवडा
नवी मुंबईतील एपीएमसी घाऊक बाजारात दररोज दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांतून नारळाच्या ६० ते ७० गाड्यांची आवक होत असते. मात्र, सणांमुळे स्थानिक पातळीसह सर्वच राज्यांमध्ये नारळाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विशेषत: गणपतीचा सण अवघ्या १५ दिवसांवर आला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा मर्यादित असल्याने आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
आधीच इंधन आणि भाजीपाल्याचे दर वाढले असताना आता नारळ ६० रुपयांपर्यंत गेल्याने सणासुदीच्या खरेदीचे गणित पार बिघडले आहे.
सुप्रिया पाटील - गृहिणी, वाशी.