नवी मुंबईचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे फिल्डवर : दिघा विभागात विविध सेवा-सुविधांची पाहणी; गुणवत्तापूर्ण कामांच्या सूचना

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिदे यांनी सर्वप्रथम आराग्य विभागाकडे मोर्चा वळवून महापालिकेच्या वाशीतील सार्वजनिक रुग्णालयाला भेट देत तेथे सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामकाजात अनेक बदल करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.
 नवी मुंबईचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे फिल्डवर : दिघा विभागात विविध सेवा-सुविधांची पाहणी; गुणवत्तापूर्ण कामांच्या सूचना

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम विविध विभागप्रमुखांकडून कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर सध्या ॲक्शन मोडवर असलेले डॉ. कैलास शिंदे यांनी आता फिल्डवर जाऊन महापालिकेच्या विविध विभागांच्या प्रत्यक्ष कामांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिघा विभागात पाहणी केली.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिदे यांनी सर्वप्रथम आराग्य विभागाकडे मोर्चा वळवून महापालिकेच्या वाशीतील सार्वजनिक रुग्णालयाला भेट देत तेथे सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामकाजात अनेक बदल करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. आरोग्य विभागानंतर आयुक्त डॉ. शिंदे यांनी महापालिकेच्या शाळांना भेटी देऊन विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षण विभागाला सूचना केल्या. त्यानंतर आयुक्तांनी ८ एप्रिल रोजी महापालिका मुख्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. या भेटीवेळीही आयुक्त शिंदे यांनी प्रशासनातील कामकाज सुधारण्याच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. त्यापाठोपाठ आता आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी १० एप्रिल रोजी दिघा विभागातील विविध सेवा-सुविधांची पाहणी केली.

रस्ते खड्डेमुक्त असावेत आणि काटेकोर स्वच्छता असावी याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देतानाच पावसाळापूर्व कामांमध्ये गटार साफ केल्यानंतर त्यातून काढला जाणारा गाळ ३ दिवसांत उचलून नेण्याच्या डॉ. शिंदे यांनी सक्त सूचना केल्या. दिघा एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात उद्योग समूह असून या भागातील शौचालयांची देखभाल दुरुस्ती काही कंपन्यांमार्फत होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.

दिघा भागात मोठ्या प्रमाणावर बोअरवेल असून त्याच्या पाण्याचा वापर योग्यरीतीने होण्यासाठी प्रणाली राबवावी. तसेच ऑनलाईन फिल्टर लावण्याची शक्यता तपासून पहावी. रस्त्यांची नियमित साफसफाई ६ वाजता सुरू होऊन ती ८ वाजेपर्यंत पूर्ण व्हावी आणि त्यानंतर अनुषांगिक स्वच्छता कामे करावीत. दिघा विभाग कार्यालयाजवळील ओएस प्लॉटवर सुरू असलेले जलकुंभ आणि माताबाल रुग्णालय इमारतीचे बांधकाम विहीत वेळेत पूर्ण करावीत. महत्त्वाचे म्हणजे बांधकामे सुरू असतानाच तेथील रस्त्यांची कामे तसेच अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याची कामे समांतरपणे करून घ्यावीत. कामांची कालमर्यादा पाळावी, अशा स्पष्ट सूचना आयुक्त डॉ. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

१४ एप्रिलला स्मारकात साजरा होणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव निवडणूक आचारसंहितेचे पालन करून साजरा करण्यात यावा. स्मारकाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर स्मारकाच्या समाज माध्यमांच्या लिंक प्रदर्शित करण्यात यावी.

-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

रस्ता सुधारण्यावर अधिक लक्ष द्या!

मुकंद कंपनीजवळ पावसाळा कालावधीत अतिवृष्टी आणि भरतीच्या काळात रेल्वेच्या पुलाखाली साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन पुलाशेजारी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाळी साचणारे पाणी वाहून जाण्यासाठी चर खोदावेत. ग्रीन वर्ल्ड इमारतीच्या पाठीमागील बाजूस डोंगराकडील पाणी खाडीकडे नेणारा नैसर्गिक नाल्याचा खाडीकडील साधारणतः ६०० मीटरचा भाग अधिक काटेकोर दक्षता घेऊन स्वच्छ करण्यात यावा. एमआयडीसी भागात खोदलेले चर संबंधित कंपन्यांनी पूर्ववत करून रस्ता सुधारणा करून देण्यासाठी कार्यवाही करावी. इलठणपाडा धरणाच्या खाली असलेली नाल्यांची प्रवाहातील घरे स्थलांतरित करण्याबाबत कार्यवाहीच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या.

डांबरीकरणाचे काम पूर्ण करा!

ठाणे-बेलापूर रोडवर सुरू असलेल्या उड्डाणपुलांवरील रस्ते डांबरीकरणाचे काम गुणवत्तापूर्ण होण्याप्रमाणेच विहीत वेळेत पूर्ण आणि वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. रस्त्याच्या दुभाजकांमधील सुशोभीकरणासाठी लावलेली झाडे-झुडपे सुकलेली असल्यास त्याचे पुनर्रोपण करण्यात यावे, असे निर्देश डॉ. कैलास शिंदे यांनी दिले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सुविधांची पाहणी करताना आयुक्तांनी तेथील साफसफाईमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या सूचना करत पहिल्या मजल्यावरील व्हर्टिकल गार्डनच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्यास सुचविले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in