

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकाच्या सचिव विभागातील कथित मनमानी आणि विस्कळीत कारभारामुळे नगरसेवकांचे वैधानिक हक्क डावलले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नगरसेविका दिव्या वैभव गायकवाड यांनी केला आहे. याबाबत त्यांनी थेट आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित सचिवांवर चौकशी व प्रशासकीय कारवाईची मागणी केली आहे.
नगरसेविका गायकवाड यांच्या निवेदनानुसार, २८ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेत ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत सहा विषयांवर चर्चा होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी शुद्धिपत्रक काढून केवळ दोन विषय सभेत घेतले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. या अचानक बदलामुळे प्रशासनातील समन्वयाचा अभाव उघड झाल्याचे त्यांनी नमूद केले असून, शहरातील वर्तमानपत्रांतही या गोंधळाची चर्चा झाल्याने महापालिकेच्या -कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण-झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेसाठी आवश्यक असलेली 'निवेदन पत्रिका' नगरसेवकांना उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
सभेत प्रस्ताव व प्रश्न मांडण्यासाठी ही पत्रिका अत्यावश्यक असतानाही ती न देणे म्हणजे नगरसेवकांच्या अधिकारांवर गदा आणणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठराविक पक्षाच्या नगरसेवकांचे प्रस्ताव कोणत्या नियमांनुसार स्वीकारले जात आहेत ? इतर सदस्यांना समान संधी का दिली जात नाही? असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या पारदर्शकतेवर बोट ठेवले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ४४ अंतर्गत नगरसेवकांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
माजी महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांच्या कार्यकाळातील निवेदन पत्रिकेची प्रत जोडून पूर्वी प्रक्रिया शिस्तबद्ध होती; सध्या मात्र जाणीवपूर्वक नियम डावलले जात आहेत, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या तक्रारीमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून आयुक्त डॉ. शिंदे यांची भूमिका काय राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सचिव विभागाच्या कामकाजावर चौकशीचे सावट आले असून येत्या सभांमध्ये प्रशासनाला स्पष्टीकरण द्यावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांमध्येही महापालिकेतील अंतर्गत गोंधळाचा शहराच्या विकासकामांवर परिणाम होणार का?, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.