नवी मुंबई : सुप्रसिद्ध कंपनीच्या 'सिनीयर व्हाईस प्रेसिडेंट'ला १९ लाखांचा गंडा; बँकेचा हेल्पलाइन नंबर Google करणे पडले महागात

गुगलच्या माध्यमातून बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधणे एका सुप्रसिद्ध कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्षाला चांगलेच महागात पडले आहे.
नवी मुंबई : सुप्रसिद्ध कंपनीच्या 'सिनीयर व्हाईस प्रेसिडेंट'ला १९ लाखांचा गंडा; बँकेचा हेल्पलाइन नंबर Google करणे पडले महागात
Published on

नवी मुंबई : गुगलच्या माध्यमातून बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधणे एका सुप्रसिद्ध कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्षाला चांगलेच महागात पडले आहे. या वरिष्ठ उपाध्यक्षाला गुगलवरून बँकेचा जो नंबर मिळाला, त्या नंबरवरील सायबर चोरट्याने या उपाध्यक्षाला मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून बँक खात्याची व डेबीट कार्डची संपुर्ण माहिती घेऊन त्यांच्या तीन बँक खात्यातून तब्बल १९ लाख २० हजारांची रक्कम परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेले ७० वर्षीय ज्येष्ठ नागरीक सीवूड्स येथील एनआरआय कॉम्फ्लेक्समध्ये कुटुंबासह राहण्यास ते नवी मुंबईतील एका सुप्रसिद्ध कंपनीमध्ये सिनीयर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. गत २४ मे रोजी दुपारी सदर ज्येष्ठ नागरीक आपल्या लॅपटॉपवर इंटरनेट बँकिंग चालू करण्याचा प्रयत्न करत होते; मात्र त्यांचे प्रोफाइल पासवर्ड लॉगिन होत नव्हते. या दरम्यान त्यांना बँकेचे प्रोफाईल पासवर्ड अपडेट करण्याबाबतचा मेसेज आल्याने त्यांनी गुगलद्वारे आपल्या बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी सायबर चोरट्याने फसवणूक करण्यासाठी गुगलवर ठेवलेला मोबाईल नंबर त्यांना सापडला.

सदर नंबरवर या ज्येष्ठ नागरिकाने संपर्क साधल्यानंतर समोरील व्यक्तीने बँकेचे प्रतिनिधी असल्याचे भासवून त्यांना बँकेचे प्रोफाईल पासवर्ड अपडेट करण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांच्याकडुन बँकेचा लॉगिन आयडी व पासवर्ड मागून घेतला. बँकेतील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून दुसऱया सायरबर चोरट्याने या ज्येष्ठ नागरिकाकडुन दुसऱ्या बँक खात्याची तसेच डेबीट कार्डची संपुर्ण माहिती घेतली. सायबर चोरटयाने या ज्येष्ठ नागरिकाला स्क्रीन शेअरींग करण्यास सांगून एका बँक खात्याचे इंटरनेट बँकींग लॉगिन करण्यास सांगितले.त्यानंतर सायबर चोरटयाने त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्यास सुरूवात केली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in