व्यसनमुक्त नवी मुंबईसाठी अत्याधुनिक सुविधा केंद्र; औषधोपचारांसोबत मानसोपचार, समुपदेशन, योग-ध्यानाची सुविधा

‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाला बळ देणाऱ्या या केंद्रामध्ये व्यसनाधीन व्यक्तींना वैद्यकीय उपचारांसोबत मानसिक आधार, समुपदेशन आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
व्यसनमुक्त नवी मुंबईसाठी अत्याधुनिक सुविधा केंद्र; औषधोपचारांसोबत मानसोपचार, समुपदेशन, योग-ध्यानाची सुविधा
Published on

नवी मुंबई : अमली पदार्थांसह विविध व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना व्यसनमुक्त करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाला बळ देणाऱ्या या केंद्रामध्ये व्यसनाधीन व्यक्तींना वैद्यकीय उपचारांसोबत मानसिक आधार, समुपदेशन आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून दिले जाणार आहे.

व्यसनमुक्ती ही केवळ औषधोपचारांची प्रक्रिया नसून रुग्णाच्या मानसिकतेचा विचार करून त्याला योग्य उपचार व मानसिक आधार देणे आवश्यक असते. याच दृष्टिकोनातून या केंद्रातील कर्मचारी आवश्यक अर्हताधारक, प्रशिक्षित आणि अनुभवी असणार आहेत. कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आवश्यक प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी प्रभावी पर्यवेक्षण यंत्रणाही कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे. या केंद्रात अनुभवी मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक, नर्सेस, वॉर्डबॉय आणि सुरक्षारक्षक कार्यरत असतील.

योग, ध्यान, व्यायामाचीही सुविधा

उपचाराच्या काळात रुग्णांचे मन सकारात्मक राहावे आणि त्यांना आनंदी व निरोगी वातावरण मिळावे, यासाठी केंद्रात कॅरम, बुद्धिबळ यांसारख्या खेळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय मानसिक शांतता, सकारात्मक विचार आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढविण्यासाठी योग, ध्यान आणि व्यायामाचीही सोय करण्यात आली आहे. या व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रात १० खाटांची निवासी उपचार सुविधा उपलब्ध केली आहे.

पुनर्वसनाची संधी

अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईसोबतच जनजागृती आणि पुनर्वसनावरही भर दिला जात आहे. ‘कॅम्पस कनेक्ट’सारख्या उपक्रमातून विद्यार्थी व तरुणांमध्ये जनजागृती केली जात आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना पुनर्वसनाची संधी देण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in