नवी मुंबई महापालिका उपायुक्त कैलास गायकवाड ACB च्या जाळ्यात; बिल पास करण्यासाठी ४२ हजार घेताना रंगेहात पकडले

या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आयुक्त कार्यालयापासून ते खालच्या स्तरापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
नवी मुंबई महापालिका उपायुक्त कैलास गायकवाड ACB च्या जाळ्यात; बिल पास करण्यासाठी ४२ हजार घेताना रंगेहात पकडले
प्रातिनिधिक फोटो
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अतिक्रमण विभागातील कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी ही लाच घेतल्याचे उघड झाले असून, या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे

या प्रकरणातील तक्रारदार कंत्राटदार दशरथ सुरवसे हे महापालिका अतिक्रमण विभागासाठी आवश्यक वाहने पुरवतात. ऐरोली विभागात अतिक्रमण हटविण्याच्या कामासाठी कंत्राटदाराने १५ नोव्हेंबर २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत काम केले होते. या कामाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे बिल प्रलंबित होते. त्यापैकी २१ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी उपायुक्त गायकवाड यांनी २ टक्के रक्कम लाच मागितल्याची तक्रार सुरवसे यांनी नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सीबीडी येथील महापालिका मुख्यालयात सापळा रचला.

यावेळी उपायुक्त कैलास गायकवाड यांनी आपल्या दालनात तक्रारदाराकडून ४२ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. सध्या गायकवाड यांची सखोल चौकशी सुरू असून त्यांच्या मालमत्तेची तपासणीही केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर उपायुक्तांचे कार्यालय आहे. याच महत्त्वाच्या ठिकाणी 'एसीबी'ने धाड टाकून ही कारवाई केल्याने आयुक्त कार्यालयापासून ते खालच्या स्तरापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in