

नवी मुंबई : दुचाकी अंगावर घालणाऱ्या दुचाकीस्वाराला हटकल्याच्या किरकोळ कारणावरुन निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या आरपीआयचे जिल्हा युवक सचिव बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावर १० ते १२ हल्लेखोर तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी मध्यरात्री दिघा रामनगर परिसरात घडली. या हल्ल्यात जखमी असलेल्या दिलपाक यांना रुग्णालयात दाखल केले. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या घटनेनंतर हल्लेखोर तरुणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यापैकी दोघांना अटक केली आहे.
दिघा येथील रामनगरमध्ये राहणारा आरपीआयचा कार्यकर्ता योगेश दारोळे हा रविवारी मध्यरात्री त्याच्या घरासमोर उभा असताना एका दुचाकीस्वाराने त्याच्या अंगावर दुचाकी घातली होती. त्यामुळे दाराळे याने दुचाकीस्वारला दुचाकी हळू चालव, असे बोलल्याने सदर दुचाकीस्वार व दराळे यांच्यात वाद झाला. या वादाचा राग मनात धरुन विशाल मोरे हा काही वेळानंतर १० ते १२ साथीदारांना घेऊन दाराळे याला मारण्यासाठी आला होता. यावेळी आरपीआयचे जिल्हा युवक सचिव बुद्धप्रकाश दिलपाक यांनी विशाल मोरे व त्याच्या साथीदारांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, विशाल मोरे व त्याच्या साथीदारांनी बुद्धप्रकाश यांच्यावरच हल्ला चढवला. त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन त्याठिकाणावरुन पलायन केले. या हल्ल्यात बुद्धप्रकाश दिलपाक हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर दिघा परिसरात तणावाचे वातावरण पसरले. रबाळे पोलिसांनी आरोपी विशाल मोरे व त्याच्या १२ साथीदारांविरोधात दंगल माजवणे, गंभीर दुखापतीसह मारहाण करणे आदी गुन्हे दाखल करुन विशाल संजय मोरे व अतुल शिवाजी वाघमारे यांना अटक केली आहे.