
नवी मुंबई : हायड्रो या विदेशी गांजा तस्करी प्रकरणी एका राष्ट्रीय हॉकीपटू दोन पोलीस कर्मचारी, यांच्यासह एकूण दहा जणांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७३ लाख ९३ हजारे ५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही टोळी सहा महिन्यांपासून कार्यरत होती.
आशिष रमेश गवारे, अहमद खालेद ऑलगी, साहील शब्बीर लांबे, सुजित रघुनाथ बंगेरा, कमल जयकिशन चांदवाणी, सचिन बाबुराव भालेराव, संजय फुलकर, अंकित पितांबरभाई पटेल, टिकुंदकुमार दिनेशभाई पटेल प्रशांत विनोद गौर असे अटक संशयीतांची नावे आहेत.
१४ एप्रिलला नेरूळ सेक्टर १५ येथे काही लोक गांजाचा व्यवहार करणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर धाड टाकण्यात आली. त्यावेळी आशिष रमेश गवारे आणि अहमद खालेद ऑलगी हे पोलिसांच्या हाती लागले तर आकाश मौर्य हा पळून जाण्यात यशस्वी झाला. अटक आरोपीकडून १ लाख ७१ हजार ९०० रुपयांचा १७. १९ ग्रॅम वजनाचा हायड्रो हा विदेशी गांजा, १ लाख १ हजार ५०० रुपयांचा १ किलो १५ ग्रॅम वजनाचा गांजा, ५०० रुपयांचा वजन काटा, १५०० रुपयांचे क्रशर, १ हजार रुपयांचे छोटे प्लास्टिक पारदर्शक बॉक्सचे दहा मग व अन्य काही साहित्य असा एकूण २ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आले होते.
या दोघांच्या अटकेनंतर हा आवाका मोठा असल्याचे लक्षात आल्यावर आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.
अटक पोलीस कर्मचाऱ्यांच्या मालमत्ता चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात अन्य १२ नावे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांच्याबाबत चौकशी सुरू आहे. यात नेमके कोण कोण आहेत ही माहिती देणे घाईचे ठरेल.
- अमित काळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा