अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एक वर्ष स्थानबद्ध; राज्यातील दुसरी, तर नवी मुंबईतील पहिलीच घटना

मानखुर्द येथे वास्तव्यास असलेला आणि नवी मुंबई परिसरात येऊन अमली पदार्थांची विक्री करणारा सराईत गुन्हेगार राजन बाळा राठोड यास स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई नवी मुंबईतील पहिली आणि राज्यातील दुसरीच घटना असल्याचे समजते.
अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एक वर्ष स्थानबद्ध; राज्यातील दुसरी, तर नवी मुंबईतील पहिलीच घटना
अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एक वर्ष स्थानबद्ध; राज्यातील दुसरी, तर नवी मुंबईतील पहिलीच घटना
Published on

नवी मुंबई : मानखुर्द येथे वास्तव्यास असलेला आणि नवी मुंबई परिसरात येऊन अमली पदार्थांची विक्री करणारा सराईत गुन्हेगार राजन बाळा राठोड यास स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई नवी मुंबईतील पहिली आणि राज्यातील दुसरीच घटना असल्याचे समजते.

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नशा मुक्त भारत २०२८ या अभियानाच्या अनुषंगाने नवी मुंबई आयुक्तालयात अमली पदार्थ तस्करीविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. वारंवार अमली पदार्थ संबंधित गुन्हे करणाऱ्या आरोपींवर पीआयटी अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे प्रस्ताव देण्याचे आदेश देण्यात आले होते.

या अनुषंगाने गृह मंत्रालय, मुंबई येथे सादर करण्यात आलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून आरोपी राजन बाळा राठोड यास एक वर्षासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.

राजन बाळा राठोड याच्यावर नवी मुंबई व मुंबई परिसरात एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण चार गुन्हे तसेच खुनाचा प्रयत्न, मारामारी आणि दरोडा अशा स्वरूपाचे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो मुंबईतून नवी मुंबई परिसरात येऊन अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्यावर पीआयटी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.

या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र ओव्हाळ, निलेश धुमाळ, तुषार माने, पोलीस हवालदार रमेश तायडे, पटु दोरे, गणेश पवार, पोलीस नाईक अंकुश म्हात्रे, महेंद्र अहिरे, हेमांगी पाटील आदींचा सहभाग होता.

logo
marathi.freepressjournal.in