नवी मुंबई : ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह' मोहिमेत २६६ तळीराम पोलिसांच्या ताब्यात

‘थर्टी फर्स्ट'च्या मध्यरात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
नवी मुंबई : ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह' मोहिमेत २६६ तळीराम पोलिसांच्या ताब्यात
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी मुंबई : ‘थर्टी फर्स्ट'च्या मध्यरात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मात्र, नवी मुंबई पोलिसांकडून ‘थर्टी फर्स्ट'च्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह'च्या मोहिमेत मद्य प्राशन करून वाहन चालविणारे २६६ तळीराम पोलिसांच्या हाती लागले आहेत. या सर्वांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. त्याशिवाय पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २३५७ वाहनचालकांवर देखील कारवाई केली आहे.

दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी ‘थर्टी फर्स्ट'च्या बंदोबस्तात तसेच नाकाबंदीदरम्यान मद्य पिऊन वाहन चालविणारे वाहनचालक आणि भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांची १ जानेवारी पहाटेपर्यत तपासणी केली.

या तपासणीत २६६ तळीराम सापडल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली. या कारवाईबरोबरच वाहतूक पोलिसांकडून विना हेल्मेट दुचाकीवरून फिरणारे, सीटबेल्ट न लावता फिरणारे तसेच दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरणारे आदी वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २३५७ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त काकडे यांनी सांगितले.

नवी मुंबईत विशेष मोहीम

थर्टी फर्स्टनिमित्त नवी मुंबई वाहतूक विभागाच्या १६ युनिटकडून आपापल्या हद्दीत ३१ डिसेंबर रोजी रात्री ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह'ची विशेष मोहीम राबविण्यात आली. यात वाशी २४, एपीएमसी १५, रबा २०, महापे १३, कोपरखैरणे १७, तुर्भे-३२, सीवुडस्‌ १३, सीबीडी १७, खारघर १४, कळंबोली २०, तळोजा १६, पनवेल शहर २२, नवीन पनवेल १०, उरण १३, न्हावा-शिवा १५ आणि गव्हाणफाटा ५ अशा एकूण २६६ तळीरामांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in