नवी मुंबई : निवडणुका अद्याप जाहीर नाहीत, तरीही गाड्यांवर मनपाचा लोगो

नवी मुंबईमध्ये निवडणुका अधिकृतपणे घोषित झाल्याही नाहीत, तरी काही इच्छुकांच्या गाड्यांवर मनपाचा लोगो आणि ‘नगरसेवक/नगरसेविका’ अशी स्टिकर्स झळकत असल्याचेही आढळून आले.
नवी मुंबई : निवडणुका अद्याप जाहीर नाहीत, तरीही गाड्यांवर मनपाचा लोगो
Published on

नवी मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे पडघम वाजत असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीसाठी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात इच्छुकांची प्रचंड गर्दी उसळली. मात्र या गर्दीसोबतच बेशिस्त पार्किंग, नियमबाह्य वागणूक आणि वाहतूक पोलिसांची निष्क्रियता असे चिंताजनक चित्रही समोर आले. निवडणुका अधिकृतपणे घोषित झाल्याही नाहीत, तरी काही इच्छुकांच्या गाड्यांवर मनपाचा लोगो आणि ‘नगरसेवक/नगरसेविका’ अशी स्टिकर्स झळकत असल्याचेही आढळून आले.

निवडणुका नाहीत, तरीही ‘नगरसेवक’ स्टिकर्स

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका २०१५ नंतर झालेल्या नाहीत. २०२० ते २०२५ दरम्यान करोना तसेच ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळे निवडणुका स्थगित राहिल्या. त्यामुळे सध्या संपूर्ण शहराचे प्रशासन प्रशासकांकडे असून कोणताही अधिकृत नगरसेवक अस्तित्वात नाही.

तरीही आरक्षण सोडतीच्या ठिकाणी अनेक गाड्यांवर मनपाचा लोगो आणि ‘नगरसेवक/नगरसेविका’ अशी स्टिकर्स झळकट असल्याचे दिसून आले. यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

दरम्यान, इच्छुकांनी रस्त्यावर, पदपथांवर पार्किंग करण्याऐवजी हाकेच्या अंतरावर असलेल्या सेक्टर १६ येथील गटारावर हेवी स्लॅब टाकून तयार केलेल्या अधिकृत पार्किंगचा वापर करण्याची तसदीही घेतली नाही.

विष्णुदास भावे नाट्यगृहात विभागनिहाय आरक्षण सोडत होत असल्याने शहरातील माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. नाट्यगृहाच्या पार्किंगची सोय अल्प असल्याने मोठ्या संख्येने आलेल्या वाहनचालकांनी थेट रस्त्यावर, बस थांब्यावर आणि पदपथांवर दुहेरी-तिहेरी रांगेत वाहने पार्क केली.

यामुळे वाशी-कोपरखैराणे या शहरातील सर्वाधिक गर्दीच्या महामार्गावर सकाळी साडेनऊपासून दुपारी दीडपर्यंत प्रचंड वाहतूककोंडी झाली. जवळील सिग्नल सुटताच वाहतूककोंडी तीव्र होत असल्याचे दृश्य सातत्याने पाहायला मिळाले.

गर्दी मोठी होणार हे माहिती असूनही वाहतूक पोलिसांपैकी एकाही अधिकाऱ्याने कारवाई तर दूरच, नियमभंग करणाऱ्यांना हटकण्याचाही प्रयत्न केला नाही, अशी नाराजी ज्येष्ठ नागरिक अरविंद झा यांनी व्यक्त केली. अशा बेशिस्त वागणुकीने वाहतूककोंडी वाढवणाऱ्यांच्या हातात शहर द्यायचे का?”असा सवाल निवृत्त प्राध्यापिका अरुणा लातूरकर यांनी उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in