नवी मुंबई : मनपा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नवी मुंबई मनपा सज्ज झाली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण नऊ लाख ४८ हजार ४६० मतदार मतदान करणारा असून त्यामध्ये ४५ हजार ५८८ इतके दुबार मतदार आहेत, अशी जाहीर कबुली नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिली. सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात यंदा १ हजार ४८ मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. मात्र त्यापैकी एकही मतदान केंद्र हाउसिंग सोसायटीमध्ये नसणार आहे असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासनाने कशा पद्धतीने तयारी केली आहे याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे म्हणाले, नवी मुंबई शहरात प्रथमच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रशासनाने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
उमेदवार जर मतदान केंद्र असलेल्या हाउसिंग सोसायटी मध्ये रहात असेल तर त्या सोसायटीमधील मतदारांवर दबाव येण्याची शक्यता असते, त्यामुळे हाउसिंग सोसायटी मधील मतदार केंद्र यंदा बंद करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर मतदारांची संख्या ८०० ते ८५० इतकी ठेवण्यात आली आहे, अशी आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, लेखा अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त भागवत डोईफोडे आदी उपस्थित होते.
साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची फौज
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची फौज तैनात ठेवली आहे. त्यापैकी ५ हजार ७०५ कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर काम करणारा असून उर्वरित कर्मचारी हे राखीव असणार आहेत, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.
दुबार मतदारांचा शोध घेणार
नवी मुंबई शहरात एकूण मतदारांची संख्या नऊ लाख ४८ हजार ४०० साठी इतकी आहे. त्यामध्ये पाच लाख १६ हजार २६७ पुरुष मतदार तर चार लाख ३२ हजार ४० महिला मतदार आहेत. दुबार मतदारांची संख्या ४५ हजार ५८८ इतकी आहे. या मतदारांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. दुबार मतदारांना एकच ठिकाणी मतदान करता येणार आहे.