Navi Mumbai Election : "... अन्यथा नाईकांचा 'टांगा' कुठे फरार होईल कळणार नाही", शंभूराज देसाई यांचा इशारा

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येऊ लागला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील हे दोन्ही घटक नवी मुंबईत मात्र एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र असून, परस्पर आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
Navi Mumbai Election : "... अन्यथा नाईकांचा 'टांगा' कुठे फरार होईल कळणार नाही",  शंभूराज देसाई यांचा इशारा
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येऊ लागला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील हे दोन्ही घटक नवी मुंबईत मात्र एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र असून, परस्पर आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर आता गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी थेट नाईक यांना इशारा दिल्याने वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) जवळपास समसमान जागांवर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे प्रचाराच्या मैदानात स्थानिक नेत्यांसह राज्यस्तरीय नेत्यांमध्येही शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी नवी मुंबईत प्रचारासाठी आलेले शंभूराज देसाई यांनी गणेश नाईक यांच्या विधानांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

गणेश नाईक यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत देसाई म्हणाले, शिंदे साहेबांचा टांगा पलटी करणे दूरची गोष्ट आहे. गणेश नाईकांनी आधी शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांचा टांगा पलटी करून दाखवावा. आम्ही महायुतीत आहोत म्हणून शांत आहोत.

मात्र शिंदे साहेबांनी आदेश दिला, तर गणेश नाईकांचा टांगा कुठल्या कुठे फरार होईल, हे त्यांनाही कळणार नाही. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेला हा शाब्दिक संघर्ष केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित राहणार नसल्याचे संकेत दिसत असून, नवी मुंबईतील या राजकीय संघर्षाचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या आक्रमक अधिकच मुंबईतील एकमेकांविरोधातील विधानांमुळे नवी निवडणूक प्रचार तापला असून, महापालिका निवडणुकीनंतर हे वाद शमणार की राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले होते गणेश नाईक

एका कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वैयक्तिक मतभेद नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, मला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी करून घोडे फरार करेन, असे शिंदे नेहमी म्हणतात. पण गणेश नाईकांना हलक्यात घेतले आणि भाजपने परवानगी दिली, तर टांगा पलटी करून घोडे फरारच नव्हे तर बेपत्ता करून टाकीन, असे वक्तव्य नाईक यांनी केले होते.

logo
marathi.freepressjournal.in