नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दि. १५ जानेवारी रोजी होणार असून, या निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे विभागनिहाय प्रशिक्षण कार्यक्रम दि. १ जानेवारीपासून सुरू आहेत. मात्र, प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या ७८२ कर्मचाऱ्यांना तात्काळ हजर राहण्याच्या कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या असून, नोटिसीची दखल न घेतल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू असून, विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे कोपरखैरणे विभागातील प्रभाग क्रमांक १०, ११, १२, १३ तसेच दुपारच्या सत्रात तुर्भे विभागातील प्रभाग क्रमांक १४, १५, १९, २० मधील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी (१, २, ३) यांचे प्रशिक्षण पार पडले. त्याचप्रमाणे, ऐरोली सेक्टर-५ येथील सरस्वती विद्यालयाच्या सभागृहात ऐरोली विभागातील प्रभाग क्रमांक ४, ५ व ७ मधील मतदान केंद्रांवर नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
यंदाची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याने प्रत्येक मतदाराला चार मते द्यावयाची आहेत. याबाबतची माहिती देणारी चित्रफित प्रशिक्षणादरम्यान दाखविण्यात आली. तसेच ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण, निवडणूक कामकाजातील प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती आणि प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.
१ जानेवारीपासून सुरू झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात आतापर्यंत नेरूळ, बेलापूर, दिघा व घणसोली या चार विभागांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या ७८२ कर्मचाऱ्यांना संबंधित विभागांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात तत्काळ उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूकविषयक कामकाज हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव ठेवून प्रत्येक कर्मचाऱ्याने नियुक्त जबाबदारी स्वीकारून आवश्यक प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे.
नोटीस मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित होत असून, तरीही नोटिसीची दखल न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे नोटिसीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.दि. ६ जानेवारी रोजी ऐरोली, कोपरखैरणे व तुर्भे विभागातील निवडणूक कामासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गास अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांनाही नोटिसा बजावण्यात येत आहेत.
६,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकूण ११४८ मतदान केंद्रे असणार असून, त्याठिकाणी सुमारे ६,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्राधान्याने रायगड जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शालेय कर्मचारी, तसेच महापालिका क्षेत्रातील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
७ जानेवारीचे प्रशिक्षण
७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता, वाशी विभागातील प्रभाग क्रमांक १६, १७ व १८ साठी निवडणूक कामावर नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार असून, नियुक्ती आदेश प्राप्त सर्व कर्मचाऱ्यांनी १०० टक्के उपस्थिती दर्शवावी आणि कायदेशीर कारवाईची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.