नवी मुंबई: सर्वत्र दिवाळीच्या आनंदोत्सवाची धूम सुरू असतानाच, नवी मुंबईतील वाशी व कामोठे परिसरात लागलेल्या दोन भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. सणासुदीच्या दिवसात घडलेल्या या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
वाशी 'सेक्टर १४' मधील रहेजा रेसिडेन्सी इमारतीतील १० व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सोमवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास आग लागली. काही क्षणांतच ही आग ११ व्या आणि १२ व्या मजल्यांवर पसरली. त्यामुळे या इमारतीच्या रहिवाशांमध्ये गोंधळ उडाला. मृतांमध्ये चिमुरडीसह एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आठ अग्निशमन गाड्या, ४० अधिकारी व स्टाफच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाने १० ते १५ जणांना सुरक्षित बाहेर काढले, मात्र इमारतीत धुराचे प्रचंड प्रमाण असल्याने बचावकार्याला अडचणी येत होत्या.
या दुर्घटनेत वेदिका सुंदर बालकृष्णन (६), कमला हिरालाल जैन (८४), सुंदर बालकृष्णन (४४) व पूजा राजन (३९) या चौघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील जखमींमध्ये मनबेंद्र घोष, मलिका घोष, ऋतिका घोष, भावना जैन, महावीर जैन, क्रिश जैन, निर्मल जैन, मेहुल जैन, दमयंती अग्रवाल, सुमंती जॉन टोप्नो या १० जणांचा समावेश आहे.
जखमींना फोर्टिस हिरानंदानी, आणि एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वाशी अग्निशमन केंद्र व महापालिकेचे अधिकारी या आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत.
कामोठ्यात मायलेकीचा दुर्दैवी अंत
कामोठे सेक्टर ३६ मधील 'अंबे श्रद्धा' या निवासी इमारतीत मंगळवारी पहाटे भीषण आग लागून मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेखा सिसोदिया आणि पायल सिसोदिया अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास या इमारतीत आग लागली. आगीची घटना कळताच कामोठे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन या इमारतीतील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यास मदत केली. बचावकार्य सुरू असताना या इमारतीत सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने परिसर हादरला. सिलिंडरचा स्फोट होण्यापूर्वी किमान ४५ मिनिटे आधी या फ्लॅटमध्ये आग लागली असावी. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेच्या वेळी सिसोदिया कुटुंबातील इतर दोन सदस्य घराबाहेर कामानिमित्त गेले असल्याने ते बचावले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.