
नवी मुंबई : फोर्टिस हॉस्पिटल (हिरानंदानी हेल्थकेअर प्रा. लि.) यांनी नवी मुंबई महापालिका (NMMC) रुग्णालयातून अधिकृतपणे रेफर करून पाठवलेल्या गंभीर रुग्णास मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला होता. नवी मुंबईतील सशक्त सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर थेट आघात करणाऱ्या या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र शब्दांत निषेध नोंदवत, रुग्णालय प्रशासनाला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
५ सप्टेंबर रोजी गणेश फसे या रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नवी मुंबई महापालिका रुग्णालयातून फोर्टिस हॉस्पिटलला अधिकृत रेफर करण्यात आले. मात्र, ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री रुग्णाला फोर्टिसमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात आल्यानंतर, हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आयसीयूमध्ये बेड उपलब्ध असूनही, महापालिकेच्या रेफर रुग्णांना रात्री प्रवेश दिला जात नाही” असे सांगत थेट नकार दिला. उलट, जर खासगी रुग्ण म्हणून भरती करायचे असेल, तर तात्काळ ८०,००० रुपये जमा करावे लागतील, अशी मागणी करण्यात आली.
ही बाब केवळ अमानवीच नाही, तर फोर्टिस हॉस्पिटल व नवी मुंबई महानगरपालिका यांच्यात झालेल्या कराराचा स्पष्ट भंग आहे. करारानुसार, फोर्टिस हॉस्पिटलने कोणत्याही वेळी १५ खाटांपर्यंत महापालिकेच्या रेफर रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. घटनेच्या दिवशी केवळ ११ रुग्ण दाखल असल्याने किमान ४ बेड उपलब्ध होते. तरीदेखील रुग्णाला नाकारण्यात आले, हे फोर्टिसचे निष्काळजीपण आणि अमानवी वर्तन ठरते, असे मनसेचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर मनसे विभाग अध्यक्ष आणि राज ठाकरे वैद्यकीय सेवा कक्षाचे सदस्य सागर विचारे यांनी २२ सप्टेंबर रोजी फोर्टिस प्रशासनाला लेखी निवेदन दिले. त्या निवेदनात प्रशासनाला ७ दिवसांची मुदत देऊन लेखी स्पष्टीकरण आणि कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र १५ दिवस उलटल्यानंतरही रुग्णालयाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.
हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोरच माहितीफलक
मनसेने थेट मैदानात उतरत, फोर्टिस हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर माहितीफलक लावले आहेत. या फलकांवर महापालिका रुग्णालय रेफर रुग्णांसाठी मदतीची गरज असल्यास मनसेशी संपर्क साधा, असा संदेश देण्यात आला आहे. तसेच, गरजू रुग्णांसाठी मनसे नेहमी सज्ज असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मनसेच्या मते, ही कृती केवळ इशारा नसून भविष्यातील अमानवी घटनांना आळा घालण्यासाठी उचललेले ठोस पाऊल आहे.