नवी मुंबईत माघी गणेश जयंती उत्साहात

गावोगावच्या मंदिरातही भाविक भक्तांनी सकाळपासूनच रांगा लावून बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
नवी मुंबईत माघी गणेश जयंती उत्साहात

नवी मुंबई : संपूर्ण नवी मुंबईत माघी गणेश जयंती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावर्षी माघी गणेश जयंतीचे भाविकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. ठिकठिकाणी घरोघरीही दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवासारखेच भक्तिमय वातावरण सर्वत्र पहावयास मिळत होते. गावोगावच्या मंदिरातही भाविक भक्तांनी सकाळपासूनच रांगा लावून बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतला.

तुर्भे गावच्या रानातील गणोबा हे एक पुरातन देवस्थान असून, या रानातील गणोबा मंदिरातही काल अगदी पहाटेपासूनच अभिषेक, महापूजा, अथर्वशीर्ष पठण, भजन, प्रवचन व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आयोजक तुर्भे ग्राम देवस्थान कमिटीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. सकाळी ५.३० वा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष, माजी नगरसेवक चंद्रकांत रामदास पाटील यांच्या शुभहस्ते गणेशाची महापूजा झाली. यानंतर शांता महिला मंडळ तुर्भे यांचा अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. सुजाता मोहन सामंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथर्वशीर्ष आवर्तन सादर केले.

यावेळी भजनरत्न महादेवबुवा शहाबाजकर, बाळारामबुवा पाटील, मीनल पाटील, कुमार गंधर्व पराग शाहबाजकर, वासुदेवबुवा मुकादम यांची सुस्वर संगीत भजने झाली. सर्व मान्यवरांना तुर्भे ग्राम देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष लक्ष्मण शंकर पाटील यांनी सन्मानित केले. दुपारी श्री गणेश जन्मोत्सव सोहळा पार पडलात्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in