नवी मुंबई पालिकेविरोधात अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण करण्याची कामगार नेते प्रदीप वाघमारेंची मागणी
नवी मुंबई पालिकेविरोधात अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

कोट्यवधींचा खर्च करून स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवनाची उभारणी सेक्टर १४/१५ वाशी येथे करण्यात आली. मात्र अनेक वर्ष उलटून गेले तरी त्याचे लोकार्पण करण्यास मनपाला वेळ मिळत नाही. सध्या या जागेचा वापर गो डाऊन म्हणून केला जास्त असून कोरोना काळातील वैद्यकीय साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले आहे. कोरोना काळात तात्पुरते रुग्णालय येथे सुरू करण्यात आले होते.

सध्या सदर इमारतीचे २४ एप्रिलपर्यंत लोकार्पण करावे तसेच वैद्यकीय साहित्याचा योग्य तो वापर सुरू करावा अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा कामगार नेते प्रदीप वाघमारे यांनी दिला आहे. वाशीतील आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना छोटेमोठे कार्यक्रम करता यावेत म्हणून या सांस्कृतिक भवनात भव्य प्रमाणात सभागृहांची निर्मिती करण्यात आली आहे. कोविड काळाच्या आधीपासून ही तीन मजली इमारत बनून तयार आहे. मधल्या काळात कोविडची परिस्थिती उद्भवल्यामुळे सदर इमारतीत कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते.

सदरचे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन हे नागरिकांच्या सोयीसाठी बनवण्यात आले असून सुसज्ज अशा प्रकारच्या सुविधा बसवण्यात आल्या आहेत.नागरिकांना चढण्या उतरण्यासाठी उदवाहक यंत्रणा ( लिफ्ट) बसवण्यात आले आहेत.नागरिकांना आपले घरगुती कार्यक्रम कमी दरात करता यावेत या हेतूने तीन मजली इमारतीत छोट्या मोठ्या आकाराचे हॉल बनवण्यात आले आहेत. ही इमारत वाशी कोपरखैरणे रस्त्यावर आहे. नागरिकांच्या हक्काच्या असलेल्या ह्या इमारतीत नवी मुंबई महानगर पालिकेने आरोग्य विभागाचे सामान ठेवले असल्यामुळे या इमारतीचे इतक्या वर्षापासून लोकार्पण केले नाही. पालिकेने नागरिकांना या इमारतीच्या वापरापासून वंचित ठेवले आहे.

सदर भवनाचे लवकरात लवकर लोकार्पण करावे म्हणून कामगार नेते प्रदिप बी.वाघमारे यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. परंतु पालिकेच्यावतीने त्यांना दाद देण्यात आली नाही. म्हणून प्रदिप बी.वाघमारे यांनी येत्या २४ एप्रिलपर्यंत ही सांस्कृतिक भवनाची इमारत पूर्णपणे मोकळी करून त्या इमारतीचे लोकार्पण करावे. या मागणीसाठी २४ एप्रिल रोजी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह भवनाच्या मुख्य प्रवेश व्दारावर अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांना निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. नवी मुंबईत अशा बऱ्याच पालिकेच्या मालमत्ता आहेत ज्या नागरिकांसाठी बनवण्यात आल्या आहेत पण त्यांचे लोकार्पण न करता त्याचा वापर स्वतः पालिकाच करत आहे.

नागरिकांच्या इमारतीचे झाले गोडाऊन

कोविड काळ निघून गेल्यानंतरही या इमारतीत नवी मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे जुने समान, गाद्या, पलंग, पी.पी.ई. किट, दवा गोळ्यांचे बॉक्स, तळ मजलासह तीन मजल्यावर भरून ठेवण्यात आले आहे. नागरिकांच्या वापरासाठी निर्माण केलेल्या इमारतीचे नवी मुंबई महानगर पालिकेने गोडाऊन करून ठेवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in