

नवी मुंबई : वसई येथील नायगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने ऐरोलीत राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवरून ओळख वाढवली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. अर्पित गुप्ता असे या तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात रबाळे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, पुढील तपासासाठी हे प्रकरण नायगाव पोलिसांकडे वर्ग केले आहे.
पीडित मुलगी ऐरोली येथे राहणारी असून ती सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे तर आरोपी नायगाव येथे राहणारा आहे. जून २०२४ मध्ये आरोपीने पीडित मुलीसोबत इंस्टाग्राममधून ओळख वाढवली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर आरोपीने मुलीला घरी बोलावले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.