

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एनएमआयए) मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी अझरबैजानच्या बाकूहून सिल्क वे वेस्ट एअरलाइन्सचे पहिले मालवाहू विमान दाखल झाले. जगातील मोठ्या द्विन-इंजिन मालवाहू विमानांपैकी एक असलेल्या बोईंग ७७७ एफ फ्रेटरचे विमानतळावर आगमन होताच वॉटर कॅननच्या सलामीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
या विमानातून सुमारे ९० टन आयात माल नवी मुंबईत आणण्यात आला. या उड्डाणामुळे सिल्क वे वेस्ट एअरलाइन्सच्या एनएमआयएवरील मालवाहू विमानसेवेची अधिकृत सुरुवात झाली असून, नवी मुंबई विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय कार्गो कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वाची भर पडली आहे.
बाकू आणि नवी मुंबईदरम्यान सुरू झालेल्या या नव्या मालवाहू सेवेमुळे भारत आणि सीआयएस प्रदेश, युरोप, पश्चिम आशिया तसेच अन्य आंतरराष्ट्रीय बाजारपेठांदरम्यान मालवाहतुकीला वेग मिळण्याची अपेक्षा आहे. उद्योग, व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मोठी मालवाहतूक आणि लांब पल्ल्याच्या सेवेसाठी सक्षम असलेल्या बोईंग ७७७ एफमुळे मोठ्या प्रमाणातील मालाची जलद वाहतूक शक्य होणार आहे. पश्चिम भारतासाठी कार्गो हब म्हणून विकसित होत असलेल्या एनएमआयएच्या वाटचालीतील हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.